कसबा बावडा : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कसबा बावडा या उपनगरामध्ये दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास महायुती शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी बलभीम विद्यालय केंद्राला भेट दिली. यादरम्यान शिंदे गटाचे समर्थक आणि ठाकरे गटाचे समर्थक यांच्यामध्ये पंचमुखी चौकात (दत्त मंदिर रोड) वादावादी होऊन अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला.
यानंतर काहींनी मध्यस्थी करून उमेदवारांसह समर्थकांना पुढे पाठवले. ही माहिती समजताच महाविकास आघाडीचे समर्थक मोठ्या संख्येने जमले. त्यांनी कवडे गल्ली येथे एकत्र जमून महायुती शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या गाडीतून अंगावर धावून जाणाऱ्या शिंदे गटाच्या समर्थकास गाडीतून खेचण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून काहींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, गाडीतील सर्वांना मुख्य मार्गावरील एका हॉटेलमध्ये थांबवण्यात आले. घटनास्थळी आमदार सतेज पाटील दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला पांगवले आणि क्षीरसागर यांच्यासह त्या समर्थकांना घेऊन चारचाकी कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
शिवसेना शिंदे गटाच्या कसबा बावड्यातील त्या प्रमुखाला सोडायचे नाही, असा महाविकास आघाडीच्या समर्थकांचा सुरू होता. दरम्यान, आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज भगव्या चौकात सर्व समर्थकांना शांततेचे आवाहन करत आपापल्या मतदान केंद्रावर जाण्याच्या सूचना केल्या.
दरम्यान, प्रिन्स शिवाजी विद्यालय येथील मतदान केंद्रावर मतदानादरम्यान एका गटाच्या कार्यकर्त्याची संशयास्पद हालचाल सुरू होती. त्याला एका माजी नगरसेवकाने हटकले असता संबंधिताने त्या माजी नगरसेवकालाच श्रीमुखात लगावल्याची चर्चा आहे.