

नाशिक : १९७५ मध्ये आणीबाणी लागू करून संविधानाची हत्या करणाऱ्या काँग्रेसचे नेते संविधानाची खोटी प्रत खिशात ठेवून संविधानाचा अवमान करीत आहेत. लोकसभेत संविधानाविषयी फेक नॅरेटिव्ह पसरवून काँग्रेस नेत्यांनी जनतेची दिशाभूल केली. आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जाळ्यात लोक अडकणार नाहीत. उलट महायुतीला भरभरून मतदान करून फसवणूक करणाऱ्या काँग्रेसचा बदला घेतील, असा दावा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju, Union Minister of Parliamentary Affairs of India) यांनी पत्रकार परिषदेत केला.
विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपच्या मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रिजिजू यांनी माध्यमांशी संवाद साधताना संविधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेस व मित्रपक्षांवर जोरदार आगपाखड केली. संविधानाच्या नावावर काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने जनतेची दिशाभूल केली जात आहे. संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने अवमान केला. लोकसभा निवडणुकीत षडयंत्र करून त्यांना मुंबईत पराभूत केले. आणीबाणीत संविधानाचा बळी घेणाऱ्या काँग्रेसकडून सत्तेसाठी आता आंबेडकर आणि संविधानाच्या नावावर लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतू लोक आता त्यांच्या या खोट्या भूलथापांना भुलणार नाहीत. राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येईल, असा दावा रिजिजू यांनी केला.
संजय राऊत यांच्या विषयीच्या प्रश्नाला बगल देताना, त्यांना आम्ही गांभीर्याने घेत नसल्याचे रिजिजू यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रमाणेच भाजपची विचारधारा आहे. मात्र बाळासाहेब हयात असताना ज्यांनी त्यांचा कडवट विरोध केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत. सावरकरांविषयी अपशब्द वापरणाऱ्या राहुल गांधींचे ठाकरेंकडून केले जाणारे समर्थन दुर्दैवी असल्याचे नमूद करत मोदींनी ठाकरेंना दिलेले आव्हान योग्यच असल्याचे रिजिजू म्हणाले.