कणकवलीतून नितेश राणे यांना भाजपची उमेदवारी

Maharashtra Assembly Polls | कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
Nitesh Rane
नितेश राणे file photo
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : भारतीय जनता पार्टीने रविवारी जाहीर केलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या यादीत कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून आ. नितेश राणे यांची उमेदवारी घोषित केली आहे. ९९ उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाने जाहीर केली असून यात आ. नितेश राणे यांचा समावेश आहे. पहिल्या यादीतच आ. नितेश राणे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. (Maharashtra Assembly Polls )

दरम्यान या मतदारसंघात ठाकरे शिवसेनेने अद्यापही आपला उमेदवार घोषित केलेला नाही. कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा जागेसाठी ठाकरे सेनेत घमासान सुरु असून या जागेबाबत मुंबईत मोठ्या घडामोडी सुरु असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघासाठी इच्छुक असलेले संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, सुशांत नाईक यांनी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची रविवारी भेट घेतली. या मतदारसंघात आ. नितेश राणेंना टक्कर देण्यासाठी संदेश पारकर यांच्या नावासाठी शिवसैनिक आग्रह करणार असल्याची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरे या चौघांपैकी कोणाच्या नावाला पसंती देतात याची उत्सुकता असून आज किंवा उद्या उमेदवाराचे नाव घोषित होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Assembly Polls )

कुडाळ-मालवण मतदारसंघात आ. वैभव नाईक यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. याठिकाणी खासदार नारायण राणे यांचे सुपूत्र माजी खा. निलेश राणे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असून ते कोणत्या चिन्हावर लढणार याची उत्सुकता आहे. शनिवारी खा. नारायण राणे यांनी मुंबई सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यासंदर्भात भेट घेतली. त्यामुळे निलेश राणे यांना भाजपमधून उमेदवारी मिळणार का? याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आमदार तथा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात ठाकरे शिवसेनेकडून राजन तेली यांना उमेदवारी मिळणार असल्याचे गृहित धरले जात आहे. याठिकाणी शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या सौ. अर्चना घारे-परब यादेखील इच्छुक असून त्यांनी यापूर्वीच तयारीला सुरुवात केली आहे. वेलीच्या शिवसेना प्रवेशामुळे महाविकास आघाडीमध्ये काहीसे नाराजी नाट्य असले तरी दीपक केसरकर यांचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे डोळे लागून आहेत. दरम्यान भाजपच्या पहिल्याच यादीत कणकवली विधानसभा मतदारसंघातून आ. निवेश राणे यांचे नाव घोषित झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून रविवारी जल्लोष सााजरा केला.

२०१९ मध्ये नितेश राणेंना मिळाली होती ८४,५०४ मते

२०१९ मध्ये कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातून आ. नितेश राणे हे भाजपमधून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे सतीश सावंत रिंगणात होते. यावेळी नितेश राणे यांना ८४,५०४ मते मिळाली होती. सतीश सावंत यांना ५६, ३८८ मते मिळाली होती. २८,११६ मतांनी नितेश राणे यांचा विजय झाला होता. जिल्हयात तीन मतदारसंघापैकी सर्वाधिक मताधिक्य नितेश राणे यांनी घेतले होते.

संजय केळकर, रवींद्र चव्हाण, प्रशांत ठाकूर पहिल्या यादीत

ठाणे : भाजपने ९९ उमेदवारांची मॅरेथॉन यादी जाहीर केली असून त्यामध्ये कोकण आणि मुंबईसह कोकणातील २४ उमेदवार जाहीर केले आहेत. रवींद्र चव्हाण, संजय केळकर, गणेश नाईक, मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, नितेश राणे या प्रमुख उमेदवारांचा पहिल्या यादीत समावेश आहे. गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या गणपत गायकवाड यांच्या जागी सुलभा गायकवाड यांना स्थान देण्यात आले आहे: तर नालासोपाऱ्यात भाजपने आपला उमेदवार दिल्याने बहुजन विकास आघाडीशी समझोत्याच्या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे. जाहीर झालेल्या जागांमध्ये ठाणे शहर संजय केळकर, भिवंडी पश्चिम महेश चौघुले, डोंबिवली रवींद्र चव्हाण, ऐरोली गणेश नाईक, बेलापूर मंदा म्हात्रे, आपला उमेदवार दिल्याने बहुजन विकास दहिसर मनीषा चौधरी, मुलूंड मिहिर कोटेचा, कांदिवली पूर्व अतुल भातखळकर, चारकोप योगेश सागर, मालाड विनोद शेलार, गोरेगाव विद्या ठाकूर, अंधरी पश्चिम अमित साटप, विलेपार्ले पराग अळवणी, घाटकोपर पश्चिम राम कदम, बांद्रे पश्चिम आशिष शेलार, मुरबाड किसन कथोरे, सायन कोळीवाडा कॅप्टन आर. तमिल सेल्वन, वडाळा कालीदास कोळंबकर, मलबार हिल मंगलप्रभात लोढा, कुलाबा राहुल नार्वेकर, पनवेल प्रशांत ठाकूर, उरण महेश बालदी, कणकवली नितेश राणे अशा मुंबईसह कोकणातील जवळपास २४ विद्यमान आमदारांना आणि नालासोपारामधून राजन नाईक तर कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड या नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून कुडाळमधून इच्छुक असलेल्या डॉ नीलेश राणे यांची वर्णी या यातीत तरी लागलेली नाही. त्यामुळे नारायण राणे यांनी फडणवीस यांची भेट घेऊनही नीलेश राणे यांची वर्णी न लागल्याने त्यांना आता शिंदे शिवसेनेची कास धरावी लागली आहे, हे स्पष्ट झाले आहे.

आजच्या भाजपच्या यादीमुळे अनेक पक्षांतरे थांबली आहेत. त्यामध्ये गणेश नाईक, किसन कथोरे पक्षांतर करतील अशी हवा होती. मात्र त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आता महाविकास आघाडीला या मतदारसंघात नवे उमेदवार शोधावे लागणार आहेत. अपक्ष महेश बालदी यांना उरणमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र गीता जैन यांना भाजपने वेटिंगवर ठेवले आहे. दुसऱ्या बाजूला नालासोपाऱ्यात भाजपने उमेदवार दिल्यामुळे बहुजन विकास आघाडीशी त्यांचा भाजपशी समझोता होणार नसल्याचे स्पष्ट याले आहे त्यामले बहुजन विकास आघाडीला महाविकास आघाडी किंवा स्वतंत्र निवडणूक लढण्याचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे. भाजपने पहिल्या यादीत जुन्याच आमदारांवर पुन्हा विश्वास टाकला आहे. कोकणातील गुहागरच्या जागेचा तिढा आजही कायम असून डॉ. विनय नातूंना पहिल्या यादीत स्थान मिळाले नाही. मुंबईसह कोकणात एकूण ७५ जागा असून यातील भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये भाजपचे २४ उमेदवार जाहीर झाले आहे. खरे तर यंदा भाजपकडून अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र जी यादी जाहीर झाली आहे, त्यानुसार पक्षाने अनेक आमदारांना पुन्हा एकदा संधी दिल्याचे दिसून येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news