

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आव्हाड हे शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी गेले आहेत. यावर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी खुलासा केला आहे. आव्हाड ठाण्याचे आहेत. त्यामुळे मित्र म्हणून त्यांना भेट घ्यायची असेल, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. आव्हाड आमच्यासोबत आले तर स्वागतच आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
सामंत म्हणाले की, दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पुन्हा एकदा शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत चर्चा होईल. मंत्रिमंडळातील खाते वाटपाबाबतची चर्चा लवकरच पूर्ण होईल. गुरूवारी शिंदे यांची अमित शहा यांच्याशी भेट झाली, तेव्हा अतिशय चांगले वातावरण होते.
दरम्यान, भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि आमचे तिन्ही नेते बैठकीत निर्णय घेतील. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील, जे केंद्रीय नेतृत्व ठरवेल, ते शिंदे यांना माहिती होईलच. जे काही बोलणं झालं, ते सगळचं प्रसार माध्यमांच्या समोर येणार नाही. पण आमची भावना आहे की, शिंदे यांनी मूळ सरकारमध्ये राहावे आणि सगळ्यांना पुढे घेऊन जावं. लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन नियमावली नसेल. जुनेच नियम आहेत, नव्याने नियम कुठले ही आलेले नाहीत, यात कोणताही बदल होणार नाही, असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकार स्थापन करण्यास वेळ लागत आहे, पण सरकार स्थापन करण्यात काहीही अडचण नाही. भाजप नेत्याची निवड लवकर होईल. मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सामंत यांनी फेटाळून लावताना सांगितले की, त्यांची तब्बेत बरी नाही, प्रत्येकाला धावपळीतून अडचणी निर्माण होतात. चांगल्या वातावरणासाठी ते आपल्या मूळगावी दरे येथे गेले आहेत.
सकाळी ७ ते १२ पर्यंत मोठ्या प्रमाणावर मतदान होते. दुपारच्या सत्रात कमी मतदान होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी जास्त मतदान होते. यात काही नवीन सिस्टीम कुठलीच नाही. विरोधकांना शंका असेल तर, ४५ हजार रुपये भरावे आणि ईव्हीएम मशीन चेक करावे, असे आवाहन त्यांनी केले. आमचा फॉर्म्युला कसा असेल यापेक्षा आपला विरोधी पक्ष नेता होणार आहे की नाही? यावर त्यांनी विचार करावा, असा टोला त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.