गडहिंग्लजः
गडहिंग्लज शहरात मागील दोन टर्म पालिका निवडणुकीत यशस्वी ठरलेल्या जनता दलाने विधानसभा निवडणुकीसाठी लढण्याची तयारी केली होती. दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत कागल व चंदगड विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला होता. आज मात्र जनता दलाने कागल विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पाठिंबा देण्यात आला.
कागल विधानसभा मतदारसंघात गडहिंग्लज शहर, कडगाव-कौलगे जि. प. मतदार संघ व उत्तूर जि. प. मतदार संघ महत्त्वाचा असून, या ठिकाणी जनता दलाची ताकद आहे. सुरुवातीला जनता दल लढणार, अशी चर्चा सुरु झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क मांडले जात होते. लोकसभा निवडणुकीत जनता दलाने चांगले काम करुनही विधानसभा निवडणुकीवेळी आपल्याला महाविकास आघाडीने विचारात घेतले नसल्याची टीका करत निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे कागल मतदारसंघात तिरंगी लढत होईल, अशी अपेक्षा होती.
मात्र जनता दलाने गुरुवारी थेट समरजितसिंह घाटगे यांना पाठिंबा दिल्याने मतदारसंघातील चित्र पालटणार आहे. गडहिंग्लज शहरामध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) व जनता दलामध्ये मोठी चुरस असून, पालिका निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर चुरशीने लढणार्या या दोन्ही गटांना आता विधानसभेमध्येही एकमेकांसमोर उभे ठाकलेले पहायला मिळणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत जनता दलाने मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्याने दोन्ही गट एकत्रच निवडणुकीला सामोरे गेले होते. आता मात्र एकमेकांविरुद्ध निवडणुकीला सामोरे जात असल्याने शहरातील वातावरण चांगलेच तापणार आहे, हे नक्की.