

नवी दिल्ली : दिल्लीत पुन्हा एकदा महायुतीची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीमध्ये जवळपास २५ जागांवर चर्चा झाली. महायुतीचे जागावापट जवळपास ठरले असून उर्वरित जागांचा तिढा सुटल्याचे समजते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, महायुतीतील जागावापट ठरले असले तरी राज्यात ५ ते ७ जागांवर तिन्ही पक्ष दावा करत असल्याने या जागांवर अंतिम निर्णय शेवटपर्यंत होण्याची शक्यता कमी असल्याचे समजते. साडेतीन तास ही बैठक चालली, तत्पुर्वी भाजपची स्वतंत्र बैठकही पार पडली.
दरम्यान, अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची चर्चा सकारात्मक झाली असुन निवडून येण्याची क्षमता हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. ज्या जागांबाबत संदिग्धता आहे तिथे जिंकण्याची क्षमता विचारात घेऊनच निर्णय होणार आहे. तसेच दिल्लीतली चर्चा आता पूर्ण झाली असून महाराष्ट्रात चर्चेची अंतिम फेरी होणार आहे. जागा वाटपाच्या अंतिम सुत्राची घोषणाही लवकरच महाराष्ट्रात होणार आहे.
दिल्लीतील महायुतीच्या बैठकीमध्ये महायुतीचा जाहीरनामा, अपेक्षित बंडखोरी टाळणे या विषयावरही चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार महायुतीचा जाहीरनामा एकत्र असणार आहे. प्रचार आणि प्रचारादरम्यानच्या जाहिरातीमंध्येही महायुतीच्या नेत्यांचे फोटो एकत्र असणार आहेत. सगळे उमेदवार महायुतीचे उमेदवार आहेत, असे समजून प्रचार करायच्या कडक सूचना अमित शाह यांनी दिल्या आहेत. तसेच बंडखोरी थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचनाही अमित शाह यांनी तिन्ही पक्षाच्या नेत्यांना दिल्या आहेत.
महायुतीच्या बैठकीपूर्वी अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये ४५ मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत राज्यातील प्रचार आणि रणनितीवर चर्चा झाल्याचे समजते. महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ असणार आहे. या पार्श्वभूमीवर मित्र पक्षांना सोबत घेणे, मित्र पक्षांसाठीही रणनीती तयार करणे मित्र पक्षांच्या मतदारसंघात सभांचे नियोजन करणे यावरही चर्चा झाल्याचे समजते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजप चांगलाच जोर लावणार आहे. यासाठी राज्यातील नेत्यांसह केंद्रीय नेत्यांच्याही सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या दरम्यान राज्यात जवळपास १०-१५ सभा घेण्याची शक्यता आहे.
भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आज उर्वरित जागांवर चर्चा झाल्याने भाजपकडून लवकरच दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीमध्ये ३० ते ३५ उमेवारांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेड लोकसभा पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी काँग्रेसने वसंत चव्हाण यांचे पुत्र रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी घोषित केली आहे. अद्याप भाजपकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. यावर चर्चा सुरु असून मारूती कवळे, राम पाटील रातोळीकर, प्रताप पाटील चिखलीकर यांच्यापैकी एक भाजपचा उमेदवार असण्याची शक्यता आहे. भाजपने भोकर विधानसभेेतून चव्हाणांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. नोंदेड लोकसभा पोटनिवडणुकीची जबाबदारी एक प्रकारे अशोक चव्हाण यांच्याकडेच देण्यात आली असुन यासाठी चव्हाण यांनी दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचे समजते.
यापूर्वी देखील महायुतीची एक बैठक अमित शाह यांच्या निवासस्थानी दिल्लीत पार पडली होती. या बैठकीला तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यावेळी आता पुन्हा दिल्लीत बैठक होणार नाही, महायुतीचे जागा वाटपाचे सूत्र जवळजवळ पूर्ण झाले आहे. यापुढील गोष्टी मुंबईत होतील, असे सांगण्यात आले होते. मात्र पुन्हा एकदा महायुतीची बैठक दिल्लीत पार पडली. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून खटके उडत असताना महायुतीत सगळे आलबेल आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतो.