फलटण : काँग्रेस, भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांची नियत बहुजनांबद्दल चांगली नाही. हे दोन्ही पक्ष मराठा-ओबीसी, धनगर- आदिवासी अशी भांडणे लावत आहेत. जोपर्यंत फुले, शाहू, आंबेडकर विचारांचं सरकार देशात आणि राज्यात येणार नाही तोपर्यंत कोणालाच आरक्षण मिळणार नाही. मी भाजपात कुजलो, सडलोय. फलटणचा उमेदवार स्वाभिमानी आहे. फलटणकरांनो दोन्ही निंबाळकरांच्या जाचातून बाहेर पडायचं असेल, तर आझाद पंछी असणारा स्वाभिमानी आमदार निवडून द्या, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले.
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील रासपचे उमेदवार दिगंबर आगवणे यांच्या प्रचारार्थ फलटण येथील आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राज्याध्यक्ष काशिनाथ शेवते, जयश्रीताई आगवणे, जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, आपचे धैर्यशील लोखंडे उपस्थित होते.
जानकर पुढे म्हणाले, आमचा उमेदवार कोणाच्या सांगण्यावरून उभा केलेला नाही. मी जनतेच्या संसारासाठी लढतोय. मी राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. कोणालाही भीक घालत नाही. कोणी धमकी देत असेल तर धमकीला धमकीनेच उत्तर देण्याची धमक माझ्याकडे आहे. भाजप मला नडले आता जानकरही भाजपला नडल्याशिवाय राहणार नाही. फलटण मतदार संघात जनसेवा करणारा उमेदवार दिलाय अशा उमेदवाराला फलटणकरांनी निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
जयश्री आगवणे म्हणाल्या, इथल्या माजी खासदारांना मी भाऊ मानलं, त्यांच्यासाठी घरोघरी फिरून मतं मागितली. त्यांनी मात्र राजकारणातून आम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. राजकारण खालच्या स्तरावर गेलंय. जनतेच्या स्वाभिमानासाठी मी लढत आहे. जनतेच्या आशीर्वादावर मी शेवटपर्यंत संघर्ष करीत राहणार. यावेळी रासपाचे राज्याध्यक्ष काशिनाथ शेवते, हर्षा आगवणे, अमित पाटील, शेखर खरात यांनी मनोगत व्यक्त केले.