

नाशिक : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असलेले हिरामण खोसकर यांच्या नावे एकूण २ कोटी ७० लाख ५२ हजार ३७६ रुपयांची मालमत्ता आहे. खोसकर यांच्या नावे एकही गुन्हा दाखल नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
खोसकर यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये संपत्तीचे विवरण सादर केले आहे. सन १९७४ मध्ये तिसरी झालेले खोसकर यांच्याकडे ३४ लाख ९७ हजार १८० रुपयांची जंगम तसेच २ कोटी ३५ लाख ५५ हजार १९६ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या नावे ३५ ग्रॅम सोने असून, एक चारचाकी वाहनदेखील आहे. दरम्यान, खोसकर यांच्या पत्नीच्या नावे २ लाख २० हजार ९०० रुपयांची जंगम मालमत्ता असून, त्यात २५ ग्रॅम सोन्याचा समावेश आहे. खोसकर यांच्या नावे शेतजमीन असून, त्यांच्यावर २८ लाख १२ हजार २१ रुपयांचे कर्ज आहे.