

नवी दिल्ली : शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी येत्या मंगळवारी (५ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यती आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात काही वेळा हे प्रकरण पटलावर होते मात्र यावर सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणूक सुरू आहे तसेच सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड हे येत्या १० तारखेला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे यावेळी तरी या प्रकरणावर सुनावणी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
राष्ट्रवादीसह शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात या दोन्ही आमदार अपात्रता प्रकरणांची सुनावणी एकाच वेळी घ्यायची, असे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले होते. त्यानुसार गेले काही दिवस दोन्ही पक्षांच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या तारखा एकत्र पडत आहेत. मात्र यावर सुनावणी होऊ शकलेली नाही.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड येत्या १० नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यांच्यासमोर आमदार अपात्रता प्रकरण आणि राष्ट्रवादीसह शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह प्रकरणाची दीर्घकाळ सुनावणी झाली आहे. मात्र या प्रकरणांवर आतापर्यंत निकाल आलेला नाही. राज्यात विधानसभेची निवडणूक सुरू आहे. या विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर पर्यंत आहे. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणावर १० नोव्हेंबरपूर्वी निकाल आला नाही तर निकाल येण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामळे १० नोव्हेंबर पूर्वी होणाऱ्या सर्व सूनावण्यांकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि नाव प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात ६ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आले. या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. यानंतर दोन्ही गटांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच असा दावा केला. हा वाद पुढे निवडणूक आयोगात गेला. आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे घड्याळ चिन्ह हे अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.