

धुळे : धुळे शहर विधानसभचे माजी आमदार अनिल गोटे यांनी अखेर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री येथे झालेल्या या कार्यक्रमात धुळे शहर विधानसभेसाठी गोटे यांना शिवसेनेच्या वतीने एबी फॉर्म देण्यात आला असून त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
धुळे शहर विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार जाहीर केला. मात्र महाविकास आघाडीचे भिजत घोंगडे होते. आज माजी आमदार अनिल गोटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आणि महाविकास आघाडीकडून गोटे यांची उमेदवारी निश्चित झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी आमदार अनिल गोटे यांच्यात पुन्हा चर्चा झाली. चर्चेनंतर ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले. दरम्यान महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचा एबी फॉर्म देखील गोटे यांना देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत तसेच धुळे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अशोक धात्रक, तेजस गोटे, सलीम शेख, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
धुळे शहर विधानसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीच्या वतीने समाजवादी पार्टीने इर्शाद जहागीरदार यांना उमेदवारी घोषित केली आहे. यासाठी गेल्याच आठवड्यात अखिलेश यादव हे धुळ्यात आले होते. या सभेत सभाचे अखिलेश यादव यांनी स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या वतीने जहागीरदार हेच उमेदवार असणार असे स्पष्ट केले होते. तर प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्या भाषणात देखील त्यांनी याच संदर्भातील भाष्य केले. मात्र आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या ठाकरे गटाने स्वतंत्रपणे माजी आमदार अनिल गोटे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या या निर्णयामुळे राज्यस्तरावर सपाच्या महाविकास आघाडी मधील जागांवर काय परिणाम होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.