नागपूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे माजी मंत्री अनिस अहमद यांनी आज (दि.२८) मुंबईत 'वंचित' मध्ये प्रवेश केला. मुंबई येथील राजगृह येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.मध्य नागपूर मतदारसंघातून त्यांना उमेदवार देण्यात येणार आहे. एक प्रकारे नाराज हलबा आणि मुस्लिम समाज यात भाजपचा फायदा तर काँग्रेसचे कोंडी होणार असल्याचे दिसत आहे.
अहमद यांनी यापूर्वी नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. भाजपने विधानपरिषद सदस्य माजी महापौर प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसने माजी नगरसेवक बंटी शेळके यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने मुस्लीम समुदायातील नेत्यांना डावलल्याने अनेक मुस्लीम नेते नाराज होते. वंचित बहुजन आघाडीने अनेक ठिकाणी वंचित जातींसोबतच मुस्लिमांनाही उमेदवारी दिली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये सर्वसमावेशकता असल्याचे सांगत राज्यातील मुस्लीम नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीत सुद्धा वंचित बहुजन आघाडीने वंचित, शोषित, पीडित, तृतीयपंथी आणि महिला अशा सर्वच समाज घटकांना उमेदवारी देत घराणेशाही आणि कुटुंबशाही जोपासणाऱ्या राजकीय पक्षांना वंचितने चपराक लगावली आहे. आरक्षण हा विषय राज्याच्या राजकारणात सध्या केंद्रबिंदू मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी इतर राजकीय पक्षांपुढे पुन्हा एकदा आव्हान उभे करणार असल्याचे बोलले जात आहे.