

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे माजी आमदार अमल महाडिक यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप कार्यालयापासून मिरवणूकीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येऊन अर्ज दाखल करण्यात आला. भाजप कार्यालयात झालेल्या छोटेखानी सभेत कार्यकर्त्यांनी '२०१४'ची पुनरावृत्ती करावी, असे आवाहन अमल महाडिक यांनी केले.
गुरुवारी (दि. 24) महायुतीच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात संवाद मेळावा झाला. या मेळाव्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. हलगी- घुमक्याच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोषी व उत्साही वातावरणात सहभाग घेतला. तिन्ही पक्षाचे झेंडे, टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भाजप कार्यालयात झालेल्या सभेत बोलताना अमल महाडिक म्हणाले, विरोधक आमदारांनी दिशाभूल करुन जनतेला मुर्ख बनविण्याचे काम केले आहे. २०१४ मध्ये नवखा असताना कार्यकर्त्यांनी प्रेम देऊन विजयी केले. त्याची पुनरावृत्ती करायची आहे. २०१९ मधील पराभवाने बरेच काही शिकलो. पराभवाच्या दुसर्या दिवशी कामास सुरुवात केली. अडचणीत जनतेने साथ दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांना कधी अंतर देणार नाही. विद्यमान आमदारांचा राजकारण हा धंदा आहे. मात्र समाजकारण आमचा वारसा आहे. केवळ विकासाचे बोर्ड लावून विकासाची दिशा दाखविणार्या विरोधकांना गाडण्याचे काम करायचे आहे. कार्यकर्त्यांना मधल्याकाळात झळ बसली, तरीही पडत्या काळातही कार्यकर्ता सोडून गेला नाही. केवळ आमदारकीवर थांबायचे नाही. स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्थांवरही आपले कार्यकर्ते गेले पाहीजे, त्यासाठी नियोजनबध्द काम करुया. दक्षिणेत वारं फिरले आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी साथ द्यावी.
खा. धनंजय महाडिक म्हणाले, जिल्ह्यात दहाही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील. त्यामध्ये दक्षिणचे उमेदवार सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी होतील. गेल्या पाच वर्षात दक्षिणला मिळालेला गोरागोमटा आमदार पाच वर्षे दिसला नाही. आता केवळ डिजिटल फलकांवर दिसत आहे. पाच वर्षे कार्यकर्त्यांचा छळ सुरु आहे. विरोधक म्हणत होते की, दक्षिणमध्ये लोकसभेला ६० हजारांचे मताधिक्य घेऊन अमल महाडिक यांनी हा दावा खोटा ठरवत हे मताधिक्य ६० हजारावरुन ६ हजारावर आणले आहे.
यावेळी आदील फरास, प्रा. जयंत पाटील, सिध्दार्थ घोडेकराव, तानाजी पाटील यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकार्यांची भाषणे झाली. यावेळी सत्यजित कदम, शौमिका महाडिक, मुरलीधर जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे, रुपाराणी निकम, नाथाजी पाटील, संदीप देसाई, डॉ. सदानंद राजवर्धन यांच्यासह घटकपक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.