Election News Nashik | यंदा लाडक्या बहिणींची मतदानात आघाडी; कोणाला 'ओवाळणी'?

Nashik : लाडक्या बहिणींचे मत कोणाच्या पारड्यात ? जिल्ह्यात गतवेळपेक्षा यंदा १०.११ टक्के वाढीव मतदान
Maharashtra assembly election 2024
विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत लाडक्या बहिणींनी केलं मतदान(छाया : हेमंत घोरपडे)
Published on: 
Updated on: 

नाशिक : जिल्ह्यातील विधानसभेच्या १५ जागांसाठी बुधवारी (दि. २०) शांततेत मतदान पार पडले असून, निवडणुकीत लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. परिणामी, २०१९ च्या तुलनेत यंदा महिला मतदानाच्या टक्केवारीत १०.११ ने घसघसशीत वाढ झाली. जिल्ह्याच्या दृष्टीने हे शुभवर्तमान आहे.

जिल्ह्यात सरासरी ६९.१२ टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावत उमेदवारांचे भवितव्य 'ईव्हीएम'मध्ये बंदिस्त केले. आता अवघ्या जिल्ह्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे महिला मतदारांचा वाढलेला मतटक्का. निवडणुकीच्या प्रचारात महायुतीकडून लाडकी बहीण योजना, एसटी बसमध्ये तिकिटात ५० टक्के सवलत तसेच कटेंगे तो बटेंगे यासारखे फॅक्टर प्रभावीपणे मांडण्यात आले. तर विरोधातील महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर महालक्ष्मी योजनेत तीन हजार रुपये मानधन, एसटीचा शंभर टक्के माेफत बसप्रवास, महिला सुरक्षितता यासारख्या प्रभावी मुद्यांचा समावेश होता.

जिल्ह्यात २४ लाख ४६ हजार ९६८ महिला मतदारांची नोंदणी झाली होती. त्यापैकी १६ लाख ५६ हजार ८२९ महिलांनी मतदान केले असून, हे प्रमाण ६७.७१ टक्के इतके आहे. सन २०१९ शी तुलना केल्यास यंदा महिला मतदानाचा टक्का १०.११ टक्क्यांनी वाढला आहे. जिल्ह्यात नांदगाव मतदारसंसघात २०१९ च्या तुलनेत यंदा सर्वाधिक १३ टक्के महिलांचे वाढीव मतदान झाले. त्या खालोखाल देवळालीत १२.०८, नाशिक मध्यत ११.७३, तर बागलाणला ११.४५ टक्के मतदान अधिक नोंदविले गेले. पण, सरतेशेवटी महिलांंचा वाढीव मतदानाचा टक्का कोणाच्या पारड्यात पडणार? कोणत्या लाडक्या भावाला बहिणींचे आशीर्वाद तारणार हे शनिवारी (दि. २३) निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.

महिलाच वरचढ

विधानसभेची यंदाची निवडणूक विविध मुद्यांमुळे खऱ्या अर्थाने वेगळी ठरली. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदारांचा उत्साहदेखील अधिक होता. जिल्ह्यात २६ लाख १४ हजार ६९ पैकी १८ लाख ४१ हजार ३८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, हे प्रमाण ७०.४४ टक्के आहे. २०१९ शी तुलना केल्यास पुरुषांच्या मतदानाच्या टक्क्यात ५.७४ टक्के वाढ झाली आहे. पण त्याचवेळी महिला मतदानाचा यंदाचा वाढीव टक्का हा पुरुषांच्या तुलनेत दुप्पट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news