नाशिक : विधानसभा निवडणुकीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. बंदोबस्त तैनात केला जात असून, नियंत्रण कक्षही सतर्क केला आहे. पोलिस ठाणेनिहाय गस्ती पथके, भरारी पथके, बूथ बंदोबस्तावरील प्रत्येक क्षणाचा आढावा नियंत्रण कक्षातून ठराविक अंतराने घेतला जाणार आहे. यासाठी नियंत्रण कक्षात सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, विशेष शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरातील तेरा पोलिस ठाण्यांची पथके, अतिरीक्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यात शहरातील मतदान केंद्रे, स्ट्राँगरूमसह इतर ठिकाणी सशस्त्र पोलिसांची पथके नियुक्त केली आहेत. पोलिस ठाणे, गुन्हे शाखांकडून नियमीतपणे प्रत्येक कारवाईचा आढावा घेतला जातो. त्याचप्रमाणे शहरातील प्रत्येक पथकाकडून ठराविक अंतराने नियंत्रण कक्षातून आढावा घेतला जात आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास संबंधित ठिकाणी अतिरीक्त पोलिसांचा फौजफाटा, मदत पोहचवण्यास सोयिस्कर होणार आहे.
पोलिस आयुक्त संदिप कर्णिकांसह चार पोलिस उपायुक्त, सात सहायक पोलिस आयुक्त, ३०० पोलिस निरीक्षक ते उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, सुमारे ३ हजार स्थानिक पोलिस कर्मचारी यांचा फौजफाटा तैनात आहे. तसेच इंडो-तिबेट सीमा पोलिस दलाच्या (आयटीपीबी) आठ कंपन्या शहरात दाखल असून सीमा सुरक्षा बलाच्या (एसएसबी) तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. गुजरात राखीव पोलिसांची (जीआरपी, मध्यप्रदेश, गुजरात येथील होमगार्डचे जवानही शहरात दाखल आहेत. राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ), रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), बॉम्ब शोधक व नाशक पथकेही तैनात आहेत.
मतदान केंद्राभोवती शंभर मीटरच्या आत फक्त मतदारांना प्रवेश असेल. तसेच परिसरात पोलिस ठाणेनिहाय गस्त राहिल. भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथकांची नाकाबंदी व वाहन तपासणी केली जात आहे. नियंत्रण कक्षातून दर तासाला पथकांकडून आढावा घेतला जात आहे. मतदानानंतर क्यूआरटी व स्ट्रायकिंग फोर्सच्या बंदोबस्तात 'इव्हीएम' रवाना होतील. सोशल मीडियावर गस्तीसाठी सायबर पोलिसांचे स्वतंत्र पथक आहे.