

डॉ. किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया हे एक टीम वर्क आहे. आणि या टीम मध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे ती मतदाराची. मतदाराने एवढेच करायचे आहे की, सजगतेने आणि सतर्क राहून मतदार यादीतील आपले नाव तपासायचे आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी मतदान आहे. त्या दिवशी न विसरता आवर्जून मतदान करायचे आहे. आणि आपल्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींना देखील मतदान करण्यासाठी प्रेरित करायचे आहे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले आहे.
लोकशाहीच्या दृष्टीने सुजाण व सजग नागरिक म्हणजे जो केवळ मतदान करतो तो नव्हे, तर त्यासोबतच जो नियमितपणे मतदार यादीतील आपले नाव व तपशील तपासतो तो आहे. आता ऑनलाईन सेवा सुविधांमुळे आणि वोटर ॲप सारख्या ॲपमुळे मतदार यादीतील आपले नाव आणि तपशील तपासणे फारच सोपे आणि सुलभ झाले आहे. मतदार यादीतील आपले नाव असल्याची व त्यासोबतचा तपशील योग्य असल्याची खातरजमा नियमितपणे करायला हवी. कारण मतदार यादीत नाव नसेल, तर मतदान करता येणार नाही. त्यामुळे वोटर ॲप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करणे, इन्स्टॉल करणे आणि आपले नाव मतदार यादीत असल्याची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे.
या लेखाच्या निमित्ताने सगळ्या पात्र मतदारांना पुन्हा एकदा विनंती आहे की, त्यांनी त्यांचे मतदार यादीतले नाव आणि मतदार केंद्र याची पुन्हा एकदा ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने खातरजमा करावी. संकेतस्थळ किंवा ॲपचा वापर करून मतदार क्रमांक व मतदान केंद्र क्रमांक शोधता येऊ शकतो. यानुसार ऑनलाइन पद्धतींचा वापर करून आपला मतदार क्रमांक व मतदान केंद्र क्रमांक शोधावा आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेही उपलब्ध असणारे आपले ओळखपत्र डाऊनलोड करून ते मतदानाला जाताना अवश्य घेऊन जावे.
मतदाराने मतदानाला जातेवेळी आपल्यासोबत छायाचित्र असलेले शासकीय ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, पारपत्र अर्थात पासपोर्ट, प्रमाणित छायाचित्र असलेले बँक पासबुक इत्यादींपैकी एक पुरावा आवर्जून सोबत न्यावयाचा आहे. हा पुरावा आणि मतदार यादीतील नाव या दोन्ही बाबी 'मॅच' झाल्यानंतर 'प्रिसायडिंग ऑफिसर' मतदाराला मतदान करण्याची अनुमती देऊ शकतो. याबाबत निवडणूक यंत्रणेने वेळोवेळी जाहिराती दिलेले आहेत. प्रसारमाध्यमांद्वारे आणि आपल्या अधिकृत समाज माध्यम खात्यांद्वारे देखील याबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येत आहे.
मतदार यादी सुधारणेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व मतदारांना एक विनंती वजा आवाहन आहे की, त्यांनी आपला भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी मतदार यादीतील तपशीलात जोडावा. जेणेकरून भविष्यात मतदार यादीतील नावामध्ये किंवा नोंदीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालास, त्याबाबतचा एसएमएस आणि ई-मेल संबंधित मतदाराला जाईल. यामुळे मतदार यादीतील नाव वगळणे किंवा मतदान केंद्र बदलणे यासारख्या बाबींची माहिती मतदाराला सहजपणे आणि थेटपणे मिळेल. या बदलात काही चूक किंवा त्रुटी असल्यास त्याबद्दल त्याला तात्काळ ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.
दरवर्षी एक जानेवारी रोजी ज्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत व जे भारतीय नागरिक आहेत, त्यांनाच मतदार नाव नोंदणी करता येत असे. यामुळे अनेकदा नव मतदारांना नोंदणीसाठी पुढील 'रेकॉर्ड डेट' पर्यंत थांबावे लागत असे. मात्र, आता यात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला असून दरवर्षी १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर अशा ४ 'रेकॉर्ड डेट' आता ग्राह्य धरल्या जात आहेत. नव मतदारांना मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी हा एक अत्यंत सकारात्मक बदल भारत निवडणूक आयोगाने यंदाच्या वर्षीपासून केला आहे.
मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा अव्याहतपणे कार्यरत असते. निवडणूक यंत्रणा जे अविरत कार्य करते ते मतदारांसाठी आणि त्यांच्या मतदानासाठी असते. त्यामुळे आज या लेखाच्या निमित्ताने मी महाराष्ट्रातील सर्व पात्र मतदारांना पुन्हा एकदा विनंती करतो की, त्यांनी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी आपल्या मतदानाचा हक्क जरूर बजावावा आणि लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.