

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ नेते अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि आमचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल. सरकार बनवताना माझी अडचण नको, असे मी त्यांना फोन करून सांगितले आहे, असे सांगत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला आहे. त्यामुळे महायुतीचा सत्तास्थापनेचा आणि मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्रिपदी शिंदे राहणार की भाजपकडे हे पद जाणार, यावर गेले चार दिवस निर्माण झालेला तिढा यामुळे सुटला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उद्या (गुरुवार) दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांसोबत बैठक होत आहे.
दिल्लीत होणार्या बैठकीत महायुतीच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यात येणार आहे. यासोबतच पालकमंत्री, महामंडळे आणि भविष्यात येणार्या विधान परिषद व राज्यसभा निवडणुकांचीही चर्चा होण्याची शक्यता आहे. एक किंवा दोन डिसेंबर रोजी राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी ‘पुढारी’ला सांगितले.
भाजप जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल आणि महायुती म्हणून आम्ही एकत्र काम करू, असे सांगत शिंदे यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदावरचा आपला हक्क सोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी दूरध्वनीवर सांगितले की, मुख्यमंत्रिपदासाठी जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या. मी तुमच्या सोबत आहे. सत्तेतील शिवसेनेचा सहभाग आणि मिळणारी मंत्रिपदे याचा निर्णय चर्चेतून घेतला जाईल. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून यात तोडगा काढला जाईल, असेही शिंदे म्हणाले. मी कुठेही गेलो नाही. मी तुमच्या बरोबरच आहे. मी नाराज नाही आणि नाराज होणाराही नाही, असे सांगत शिंदे यांनी ते नाराज असल्याचे वृत्त फेटाळून लावले.
मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाणार, हे स्पष्ट झाल्यानंतर भाजप या पदासाठी कुणाची निवड करणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव या स्पर्धेत आघाडीवर आहे. तथापि, इतर नावांचीही चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस यांना मुख्यंमत्री बनविण्यात यावे म्हणून राज्यभरात भाजप नेत्यांकडून मागणी केली जात आहे. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठींनी याबाबत स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे अनेक घटकांनी लॉबिंग सुरू केले आहे.
ओबीसी समाजाने महायुतीला भरभरून मते दिली, त्यामुळे ओबीसी समाजातील नेत्याला संधी दिली जावी, अशी मागणी केली जात आहे. 2014 मध्ये भाजपला पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली तेव्हा भाजपचे तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदी संधी देण्यात आली. यावेळी विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार केला जावा, असाही एक मतप्रवाह पाहायला मिळत आहे. राम शिंदे यांच्याही नावाचा आग्रह एका गटातर्फे केला जात आहे. यामुळे ओबीसींना प्रतिनिधित्व देत धनगर समाज भाजपसोबत जोडणे, महादेव जानकर यांच्याकडील धनगर समाजाची मतपेढी फोडणे, ही रणनीती यामागे आहे.
पंकजा मुंडे यांचेही नाव एका गटातर्फे पुढे केले जात आहे. मराठवाडा, ओबीसी आणि महिला अशा तीन घटकांना प्रतिनिधित्व यानिमित्ताने मिळेल व लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री केल्याचे श्रेय भाजपला मिळेल, असा दावा मुंडे समर्थक करीत आहेत. शिवाय, राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या मराठा नेत्याला मुख्यमंत्रिपदी संधी दिली जावी, अशी मागणीही एका गटातर्फे केली जात आहे. यासाठी विनोद तावडे, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील या नेत्यांची नावे पुढे केली जात आहेत. मध्य प्रदेश, राजस्थानप्रमाणे धक्कातंत्राचा अवलंब भाजपकडून केला जाणार काय, हाही मोठा प्रश्न आहे.
शिवसेना शिंदे गटाला उपमुख्यमंत्रिपद मिळणार असून, या पदावर स्वतः शिंदे राहतात की इतरांना संधी देणार, याचीही चर्चा सुरू आहे. शिंदे स्वतः सरकारमध्ये असल्याशिवाय त्यांच्या पक्षाचे मंत्री व आमदार यांच्यावर नियंत्रण ठेवणे त्यांना शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांनीच सरकारमध्ये जावे, असे त्यांना सुचविण्यात आले आहे. याशिवाय श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद देण्याची मागणी शिंदे यांच्याकडून केली जाऊ शकते.