मुंबई : लाडकी बहीण म्हणून मतांसाठी १५०० रुपये देण्याचा गवगवा करणाऱ्या भारतीय जनता पार्टीची माता भगिनींबद्दलची खरी मानसिकता काय आहे. हे सर्वांनी ऐकले आहे. भाजपचे माजी खासदार सुजय विखेंच्या संगमनेरमधील सभेत वसंत देशमुख या भाजप पदाधिकाऱ्याने विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरातांबद्दल अत्यंत हिन, निर्लज्ज व पातळी सोडून भाषा वापरली. वसंत देशमुखांनी वापरलेली भाषा ही भाजपची महिलांबद्दलची खरी मानसिकता दाखवते, अशा विकृत मानसिकतेला माता भगिनीच जागा दाखवतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
यासंदर्भात भाजपचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, संगमनेरच्या सभेत विखेंच्या कार्यकर्त्याने, “निवडणुकीच्या काळात आम्ही मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही”, अशी थेट धमकी देत तिच्या चारित्र्यावरही शिंतोंडे उडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुजय विखे व्यासपीठावरच होते. अशी वक्तव्य करणारा व्यक्ती वयाने ज्येष्ठ दिसतो. महिलांबद्दल अशी भाषा भाजपवालेच बोलू शकतात, हीच त्यांची संस्कृती असून ब्रीजभूषणपासून गल्ली बोळातल्या पदाधिकाऱ्यांनी ते दाखवून दिले आहे. हा केवळ डॉ. जयश्री थोरात यांचा अपमान नाही तर राज्यातील सर्व महिलांचा अपमान आहे. राज्यातील माता भगिनी या अपमानाचा व्याजासह निवडणुकीत बदला घेतील असेही नाना पटोले म्हणाले.
संगमनेर प्रकरणी भाजपाकडून आता सारवासारव केली जात आहे. पण यामुळे त्यांची मानसिकता बदलणार नाही. पोलीस महासंचालकांनीही पक्षपातीपणा न करता कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करावे. वसंत देशमुख या विकृत व्यक्तीला तात्काळ बेड्या ठोकाव्यात. निवडणूक आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वसंत देशमुख व सुजय विखेवर कारवाई करावी, असेही नाना पटोले म्हणाले.