पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगच्या तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. औसा तालुक्यातील कासार शिरशी येथे मंगळवारी (दि.१२) सभेसाठी आलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बॅगची तपासणी केली. औसा येथे हेलिपॅडवर नियुक्त केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी यावेळी निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही बॅगा तपासा, असा सल्ला त्यांनी या कर्मचाऱ्यांना दिला. विशेष म्हणजे बॅग तपासणीचा व्हिडिओ ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला.
यावरुन भाजपने 'काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते', असे म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बॅगचीही तपासणी झाल्याचा व्हिडिओ भाजपने त्यांच्या X अकाऊंटवर शेअर केला आहे.
''हा व्हिडिओ पाहा, ७ नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हीडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली. त्यापूर्वी, ५ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर सुद्धा फडणवीस यांच्या बॅग्जची तपासणी झाली.'' (हा तो ५ नोव्हेंबरचा व्हिडिओ)
दिखाव्यासाठी केवळ संविधान हाती घेऊन चालत नाही, तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात. संविधानाचे भान प्रत्येकाला असलेच पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे, असे भाजपने पुढे म्हटले आहे.