नागपूर : राज्यभरात विधानसभा निवडणूक मतदान आटोपताच भाजप नेते, मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट संघ मुख्यालयात पोहोचले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी त्यांनी सुमारे 30 ते 40 मिनिटे बंदद्वार चर्चा केली. राज्यात निकालानंतर राजकीय अनिश्चितता,काही नवे समीकरण उद्भवल्यास काय ही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. यासोबतच राज्यात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वात महायुती सरकार सत्तेत येईल असा विश्वास यावेळी फडणवीस यांनी भागवत यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
निवडणूक प्रक्रिया, संघ परिवाराचे योगदान यासोबतच इतरही विषयांवर यावेळी चर्चा झाली. यानंतर फडणवीस यांनी बडकस चौक परिसरात आमदार प्रवीण दटके व काही भाजप पदाधिकारी यांच्याशीही चर्चा केली व पुढे रवाना झाले. याच मध्य मतदारसंघात प्रियंका गांधी यांच्या रोड शो दरम्यान भाजप - काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आले होते. आजही मतदानादिवशी काही भागात तणावाची परिस्थिती उद्भवली. याठिकाणी भाजपचे प्रवीण दटके, काँग्रेसचे बंटी शेळके, हलबा समाजाचे नेते रमेश पुणेकर यांच्यात लढत आहे.