शिराळा, पुढारी वृत्तसेवा : शिराळा मतदारसंघातील भाजप उमेदवार सत्यजित देशमुख निवडून येणे निश्चित आहे. कारण मी पावसात सभा घेत आहे. पावसात सभा घेणं हे शुभ संकेत आहेत, हे काही नेत्यांचे म्हणणं आहे. परंतु, पाऊस पडो ना पडो, पण मतांचा पाऊस शिराळा विधानसभा मतदारसंघात पडणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते आज (दि.१५) शिराळा येथे जाहीर सभेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, दिवंगत माजी मंत्री शिवाजीराव देशमुख यांच्यातील अनेक गुण आम्हाला सत्यजित देशमुख यांच्यात दिसतात. जयंत पाटील जलसंपदा मंत्री होते. पण किती रुपये त्यांनी दिले? पण मी हजारो कोटी रुपये वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी दिले आहेत. त्यामुळे सर्व टप्पे पूर्ण करण्यास पैशांची कमतरता भासू देणार नाही. शिवाजीराव देशमुख यांच्या स्वप्नातील २६ सिंचन योजना आम्ही पूर्ण करू. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनस्पर्श झालेल्या भुईकोट किल्ल्याची देखील डागडुजी करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
शरद पवार शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स लावू नका, यासाठी जायचे. पण मोकळ्या हाताने परत यायचे. पण आम्ही एका झटक्यात दहा हजार कोटींचा शेतकऱ्यांवरचा इन्कम टॅक्स कमी केला आहे. एफआरपी जास्त होते म्हणून शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स लावणे कधीच बरोबर नाही. एक रुपयांत पीक विमा आपण आणली आहे. कृषी वीज पंप मोफत योजना आपण आणली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी सरकार सत्तेवर आल्यावर करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
ज्या शेतकऱ्यांला दिवसा वीज हवी, त्याला दिवसा आणि ज्याला रात्री हवी त्याला रात्री वीज मिळेल. सर्व सिंचन योजना सोलर वरती आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात ११ लाख लखपती बहीण आम्ही तयार केल्या आहेत. हा आकडा लवकरच २५ लाखांपर्यंत जाईल. सर्व योजना चालू ठेवायच्या असतील, तर येत्या २० तारखेला कमळाचे बटन दाबा,असे आवाहन त्यांनी केले.
शिराळामधील बंडखोरी मागे घेतलेल्या महाडिक गटाला वाऱ्यावर सोडणार नाही. सम्राट महाडिक या वाघासारख्या नेतृत्वाचे कल्याण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. त्यामुळे शिराळा विधानसभेचे हे मैदान फत्ते करा आणि गुलाल घेऊन भेटायला या, असे फडणवीस यांनी आवाहन केले.