

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील विधानसभेत महायुतीची सत्ता अबाधित राहिली आहे. सर्वाधिक जागा जिंकत भाजप महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील. यावरून आमच्यात कोणतेही वाद नाहीत. भाजपचे अध्यक्ष, शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२३) निकालानंतर दिली.
ते पुढे म्हणाले की, मी भाजपचा साधा कार्यकर्ता आहे. हा भाजपचा विजय आहे. यात माझे योगदान कमी आहे. मी आधुनिक अभिमन्यू आहोत, विधानसभा निवडणुकीचा चक्रव्यूह तोडून दाखविला आहे. हा अभेद्य युतीचा विजय आहे. राज्यातील सर्व समाजाच्या घटकांनी विजय मिळवून दिला आहे. खास करून आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहिला आहे. मोदींचा 'एक है, तो सेफ है' हा नारा जनतेने खरा करून दाखवला.
विरोधी पक्षांचा फेक नॅरेटिव्ह जनतेने धुडकावून लावला. तसेच मतांचे धुव्रीकरण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसला. राज्यातील विविध घटकांचा, पंथाचा, संतांचा विजयात वाटा आहे. महायुतीचे लाखो कार्यकर्तांचा हा विजय आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकजुटीचा हा विजय आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे आभार मानतो, त्यांनी राज्यात प्रचार करून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरली. त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मार्गदर्शन केले. मोठ्या विजयाबद्द्ल महाराष्ट्रातील जनतेसमोर नतमस्तक होऊन साष्टांग दडवंत घालतो. जनतेचे आभार मानतो. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.