वाई : विधानसभा निवडणुकीसाठी शनिवार, दि. 23 रोजी मतमोजणी झाली आहे. यासाठी वाई विधानसभा मतदारसंघातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. वखार महामंडळाच्या गोदाम क्रमांक 5 येथे मतमोजणी होणार आहे. यासाठी 20 टेबल्स ठेवण्यात आली असून 24 फेर्यांमधून निकाल जाहीर केला जाणार आहे. पहिला कल येण्यास साधारणत: 10 वाजणार असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
बुधवारी वाई विधानसभा मतदारसंघासाठी 67.57 टक्के मतदान झाले आहे. मतदान झाल्यानंतर मतदारसंघातील 471 केंद्रावरील ईव्हीएम मशिन्स वखार महामंडळाच्या गोदाम क्रमांक 5 येथे सीलबंद करून ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असून या भागात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. मतमोजणीसाठी एकूण 20 टेबल्स ठेवण्यात आली आहे. टपाली मतपत्रिका मोजण्यासाठी 6 टेबल आणि सैनिकी मतदार मतपत्रिकेसाठी 3 ठेवण्यात आले आहे.
प्रत्येक फेरीमध्ये एकूण 20 मतदान यंत्राद्वारे मतमोजणी होणार आहे. त्यामुळे 471 केंद्र मोजणीसाठी 24 फेर्या होणार आहेत. यामध्ये 23 फेर्या पूर्ण होणार असून 24 व्या फेरीमध्ये 11 केंद्र मोजली जाणार आहेत. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनिहाय निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, या मतमोजणीसाठी उमेदवाराला 29 प्रतिनिधी द्यावे लागणार आहे. यासाठी संबंधितांनी अर्ज करावा. मतमोजणी प्रतिनिधींना अधिकृत ओळखपत्र देण्यात येणार आहे. ओळखपत्राशिवाय मतमोजणी प्रतिनिधी यांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचेही राजेंद्र कचरे यांनी सांगितले.