पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. यासाठी 14 टेबलवरून 25 फेर्यांत मतमोजणी होणार आहे. याकरिता प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणीसाठी सुमारे 215 अधिकारी, कर्मचारी, तर 137 पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम, रेल्वे मैदानसमोर, कराड रोड, पंढरपूर येथे होणार आहे. मतमोजणीसाठी 14 टेबल संख्या आहे. 25 फेर्यांतून मतमोजणी पूर्ण होणार आहे. यामध्ये पोस्टल मतदान मोजणीसाठी पाच टेबल, तर ईटीबीएस मतमोजणीसाठी दोन टेबल राहणार आहेत. एका टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहायक, एक शिपाई व एक सूक्ष्म निरीक्षक राहणार आहे. मतमोजणी कक्षात मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, निवडणूक निर्णय अधिकारी, निरीक्षक, उमेदवार व निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुरेसा वीजपुरवठा व जनरेटर बॅकअप आदी सुविधा असणार आहेत. संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेसह आग प्रतिबंधक सुविधा, स्वच्छतागृह, प्राथमिक वैद्यकीय सेवा असणार आहेत. मतमोजणी केंद्रात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या अधिकृत पासधारकांसह मतमोजणीसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच मोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाईल. मतमोजणी कक्षात मोबाईल तसेच आक्षेपार्ह वस्तू नेता येणार नाहीत. स्वतंत्र माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याद्वारे माध्यम प्रतिनिधींपर्यंत माहिती पोहोचवली जाणार आहे. सुरक्षा व गोपनीयतेच्या द़ृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. मतमोजणीच्या वेळी राजकीय कार्यकर्ते, मतमोजणी प्रतिनिधी यांनी शांतता राखून सहकार्य करावे, असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.