कोल्हापूर : निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नेत्यांवरील प्रचंड रेट्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक राजेश लाटकर यांना दिलेली उमेदवारी 48 तासांत बदलण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी रात्री उशिरा मधुरिमाराजे यांना कोल्हापूर उत्तरचे तिकीट देत असल्याचे पत्र जारी केले आणि काँग्रेसमध्ये सोमवारी दिवसभर सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींवर पडदा पडला.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने राजेश लाटकर यांना शनिवारी उमेदवारी जाहीर होताच पक्षांतर्गत विरोधाची जणू लाट उसळली. याच दिवशी काही कार्यकर्त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयावर दगडफेक करीत राजेश लाटकर यांच्यावरील आपला रोष व्यक्त केला होता. विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षात सर्वाधिक उमेदवार इच्छुक होते. महाविकास आघाडी आणि महायुती अंतर्गत असणार्या पक्षांमध्ये या जागेसाठी अखेरपर्यंत जोरदार रस्सीखेच सुरू होती. जागेसाठी जशी रस्सीखेच सुरू होती, तशी उमेदवारांमध्यही प्रचंड चुरस होती. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चा सुरू राहिली.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात जोरदार चढाओढ सुरू होती. महायुतीकडून राजेश क्षीरसागर, कृष्णराज महाडिक, सत्यजित कदम यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा होती; तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून आमदार जयश्री जाधव यांच्यासह शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, राजेश लाटकर यांची नावे आघाडीवर होती. काँग्रेसकडून मधुरिमाराजे किंवा माजी आमदार मालोजीराजे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढावे, असे काँग्रेसच्या नेत्यांचे मत होते. त्यासाठी त्यांच्यावर वरिष्ठ पातळीवरूनही प्रयत्न सुरू होते. परंतु घरात खासदार असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय मधुरिमाराजे व मालोजीराजे यांनी पक्षाला कळविला. तरीही त्यांच्यासाठी आग्रह सुरू होता. परंतु ते आपल्या मतावर ठाम राहिल्यामुळे काँग्रेसच्या वतीने माजी नगरसेवक राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. लाटकर यांना उमेदवारी जाहीर होताच पक्षांतर्गत विरोधाची लाट उसळली.
लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या दिवशीच कोल्हापूर उत्तरसाठी इच्छुक असणारे काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या समर्थकांनी रात्री काँग्रेस कमिटीवर दगडफेक करून लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला. उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांच्या भावना तीव्र असणे स्वाभाविक असणारच, असे समजून त्यांनी गो स्लोची भूमिका घेतली. परंतु दुसर्या दिवशीही लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध सुरूच राहिला. हा विरोध लाटकर यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत गेला. त्यानंतर मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारी बदलाबाबाबत विचार करण्यास सुरुवात केली. लाटकर यांना दुपारी धक्काबुक्कीचा प्रकार झाल्यानंतर रात्री माजी नगरसेवकांनी लाटकर यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या निवेदनावर 27 नगरसेवकांचा समावेश होता. लाटकर यांच्या उमेदवारीबद्दल प्रचंड नाराजीचा सूर उमटत असून हा उमेदवार लादला असल्याचे जनतेतून बोलले जात होते. याचा विचार करून आपण वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून लाटकर यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली.
नगरसेवकांच्या या निवेदनाची दखल घेऊन काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी चंदगडला जाणार असल्याने आपण माजी आमदार मालोजीराजे यांच्याशी चर्चा करावी, असे सांगितले. त्यानुसार सकाळी अकरापासून माजी नगरसेवक न्यू पॅलेस येथे जमू लागले. माजी आमदार मालोजीराजे यांच्याशी माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी त्यांनी लाटकर यांची उमेदवारी कशी अयोग्य आहे, त्यांच्या उमेदवारीला जनतेतून कसा विरोध आहे ते पुन्हा एकदा सांगितले. त्यामुळे इतर इच्छुकांपैकी एक किंवा मधुरिमाराजे यांना उमेदवारी द्यावी. कोल्हापूर उत्तर मधून मधुरिमाराजे उमेदवार असतील तर आमची काहीच अडचण नाही. आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करू, अशी ग्वाही नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने दिली. यावेळी मालोजीराजे यांनी राजेश लाटकर यांच्याशीही आपण चर्चा करावी, असे सांगितले.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, राजाराम गायकवाड, संजय मोहिते, प्रताप जाधव, दुर्वास कदम, इंद्रजित बोंद्रे, प्रकाश नाईकनवरे, विक्रम जरग आदी उपस्थित होते.
माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने कावळा नाका येथे राजेश लाटकर यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी लाटकर यांनी आपण प्रत्येक निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले आहे. उमेदवारी निवडीची प्रक्रिया होऊन माझी उमेदवारी निश्चित झाली आहे. असे असताना आपण लॉबिंग करता हे योग्य नाही. आम्ही कधी तसे केले नाही. यासंदर्भात आ. सतेज पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ , असे सांगितले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनीही राजेश लाटकर यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सुमारे तासभर आ. पाटील यांनी त्यांच्याशी चर्चा केली.
चंदगडहून आल्यानंतर आ. सतेज पाटील व माजी आमदार मालोजीराजे यांच्यामध्ये अजिंक्यतारावर चर्चा झाली. मालोजीराजे यांनी नगरसेवकांची भूमिका आ. पाटील यांना सांगितली.