गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी विधानसभेत काँग्रेसने तिरोड्याचे माजी आमदार दिलीप बनसोड यांना उमेदवारी दिल्याने इच्छुक असलेले अजय लांजेवार व त्यांच्या समर्थकांकडून आज, ( दि. २८) कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वाहन थांबविले.अर्जुनी-मोरगाव येथे कॉंग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या रॅलीवेळी हा प्रकार घडला . यावेळी पार्सल उमेदवार दिल्याचे आरोप करून रोष व्यक्त केला व स्थानिकांना उमेदवारी देण्याची मागणी करत घोषणाबाजी केली.
महाविकास आघाडीतर्फे जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला सोडण्यात आल्यानंतर येथील स्थानिक कार्यकर्त्यांना तिकीट देण्याची मागणी होती. मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्टींकडून माजी आमदार दिलीप बनसोड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश करणारे अजय लांजेवार व राजेश नंदागवळी यांनी नाराजी दर्शवत अपक्ष नामांकनपत्र दाखल करणार असल्याचे काल, पत्र परिषदेतून जाहिर केले होते. दरम्यान, आज, सोमवारी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप बनसोड यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी अर्जुनी-मोरगाव येथील प्रसन्न सभागृह येथे कार्यकर्ता मेळावा आयोजन करून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत नामांकन रैलीचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, आयोजित रैलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार प्रशांत पडोळे, उमेदवार दिलीप बनसोड यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते रैलीत सहभागी झाले होते. यावेळी येथील जुने बसस्थानक परिसरात नाराज असलेले अजय लांजेवार व राजेश नंदागवळी यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या रैलीसमोर आपली रैली आणत राडा करण्याचा प्रयत्न केला. तर पटोले यांच्या वाहनाला रोखून धरत 'पार्सल हटाव कॉंग्रेस बचावʼ, 'बहार का पार्सल नही चलेगाʼ, 'स्थानिकांना संधी द्याʼ अशा घोषणाबाजी केल्या. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनातर्फे पोलीस बल वाढविण्यात आले होते.
लांजेवार यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पक्षविरोधी वातावरण निर्माण करून आपल्या समर्थकांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर घोषणाबाजी केली. यावर कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून दोघांना पक्षविरोधी काम केल्याच्या कारणावरून पुढील ६ वर्षांकरिता काँग्रेस पक्षातून निलंबित केले आहे. तर तसे पत्रही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे.