मुंबई : लोकसभा निवडणुकीत जे काही वारे निर्माण झाले होते ते आता फिरले आहे. राज्यात शंभर टक्के पुन्हा महायुतीचे सरकार येईल असे वातावरण आहे. जनता योग्य निर्णय घेईल आणि आम्हाला सत्तेवर आणेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी शिवाजी पार्क येथे गुरुवारी शेवटची सभा घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी ही विकासाची मारेकरी आहे. यापूर्वी बंद सम्राट मुख्यपदावर बसले होते. तेव्हा आणि आत्ताही त्यांची भाषा बंदची आहे. ते म्हणतात आमचे सरकार आल्यावर आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट बंद करू, धारावी बंद करू, रिफायनरी बंद करू. काय बंद करणार यापेक्षा काय चालू करणार ते त्यांनी सांगावे. त्यामुळे या बंद सम्राटाला आता कायमचे घरात बंद करण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
आम्ही दोन वर्षापूर्वी विकासाच्या मोदी कार्यात सहभागी झालो. त्या विकासाची फळे आता राज्यातील जनता चाखत आहे. २००४ ते २०१४ या दहा वर्षात काँग्रेसच्या पंतप्रधानांनी राज्याला केंद्रातून दोन लाख कोटी रुपये दिले. मोदींनी २०१४ ते २०२४ या वर्षात १० लाख कोटी दिले. काँग्रेसपेक्षा राज्याला पाचपट अधिक निधी दिला. म्हणून विरोधकांच्या पोटात दुखत आहे, असा टोलाही शिंदेंनी लगावला. राज्यात समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर ठरला आहे. राज्य उद्योगात पहिल्या क्रमांकावर आहे. तशी आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही एक गेमचेंजर योजना आणली आहे. त्यामुळे महाभकास आघाडीवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कालपर्यंत हे लोक म्हणत होते की भीक देताय का? बहिणींना लाच देताय का? आमच्या योजनांना विरोध करणारे आता आमच्या योजना चोरायला लागतेत, अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी केली.