

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची आज सोमवारी विधानसभेत एकमतीने निवडीची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदी निवडीसाठी सभागृहात प्रस्ताव मांडला. त्याला अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर नार्वेकर दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नार्वेकर यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ''राहुल नार्वेकर यांची फेरनिवड झाली, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. विरोधी पक्षाने काही अपवाद वगळता बिनविरोध निवडणूक केली. विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो. अध्यक्ष तुम्ही मी पुन्हा येईन असे म्हटले नव्हते तरी तुम्ही पुन्हा आलात,'' असे फडणवीस यांनी सभागृहात बोलताना म्हटले.
राहुल नार्वेकर पहिल्या कार्यकाळात अध्यक्ष बनले. त्यानंतर ते दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. नाना पटोले तुमचे आभार मानायला हवे. कारण तुम्ही त्यावेळी वाट मोकळी केली म्हणून ते त्यावेळी अध्यक्ष झालेत, असे फडणवीस म्हणाले.
राज्याच्या इतिहासात सर्वात चर्चेत राहिलेले अध्यक्ष म्हणजे राहुल नार्वेकर आहे. पाच वर्षांच्या या संक्रमण काळात मीडियाचे तुमच्याकडे लक्ष होते. नार्वेकर अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्त्व आहे. मुंबई, कोकणात अनेक दिग्गजांनी जन्म घेतला. सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा मान चार लोकांनाच मिळाला. त्यात आपण गणले जाणार आहात. सभागृहाचे काम आणि नियम यांचा अध्यक्षांचा चांगला अभ्यास आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी नार्वेकर यांचे कौतुक केले.
सभागृहाच्या दालनांचा चेहरा अध्यक्षांनी बदलला. कितीही गरम चर्चा झाली तरी त्यांच्या दालनातील कॉफीने वाद संपतात. ते डावीकडील आणि उजवीकडीलही आवाज ऐकतात. त्यांना डावीकडील आवाज सूक्ष्मपणे ऐकावा लागेल, असे फडणवीस यांनी नमूद केले.
त्यांनी एक ऐतिहासिक निकाल दिला. काही लोकांनी अध्यक्षांवर पातळी सोडून टीका केली. पण त्यांनी संयम ठेवला, असेही फडणवीस यांनी नार्वेकर यांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक केले.