

सांगरुळ : करवीर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मंगळवार दि. 29 रोजी प्रंचड शक्तिप्रदर्शन करत करवीर विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते भगवे झेंडे, भगव्या टोप्या परिधान करून एकत्र आल्याने खानविलकर पेट्रोल पंप ते रमणमळा चौक हा रस्ता भगवामय झाला होता. जणू रस्त्यावर भगवे वादळ अवतरले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व चंददीप नरके यांचे फोटो , कटआऊट घेतलेले कार्यकर्ते तसेच ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. चंद्रदीप नरके म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करवीर विधानसभा मतदारसंघासाठी 100 कोटींचा निधी आणला आहे. महायुतीच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविला आहे.
यावेळी माजी खासदार मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची भाषणे झाली.यावेळी शिवसेनेचे निरीक्षक उदय सावंत, महेश जोगळेकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, गोकुळचे संचालक अजित नरके, एस. आर. पाटील, कुंभीचे उपाध्यक्ष राहुल खाडे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे, यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष एकनाथ पाटील, अरुण इंगवले, वीरेंद्र मंडलिक, मधुकर जांभळे, हंबीरराव पाटील, के. एस. चौगुले, के. एन. पाटील, दत्तात्रय मेडशिंगे, देवराज नरके, राजवीर नरके, कुंभी कारखाना, कुंभी बँक, तसेच विविध सेवा संस्था, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळी नऊ वाजल्यापासूनच खानविलकर पेट्रोल पंपाजवळ करवीर, पन्हाळा, गगनबावडा येथील युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाल्याने कसबा बावडा रोड गर्दीने फुलून गेला होता.
अर्ज भरायला येणार्या कार्यकर्त्यांना वाहतुकीच्या गर्दीमुळे वेळेत पोहोचता आले नाही. मिरवणूक संपल्यानंतरही शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते चंद्रदीप नरके यांना भेटत होते.