

गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार शिवाजी पाटील यांच्या महागाव येथील मिरवणुकीवेळी आरतीमधील दिव्याचा थेट गुलालाशी संपर्क आल्याने आगीचा भडका उडाला, यामुळे काहीकाळ गोंधळ उडाला. सुदैवाने यामध्ये कोणाला फारशी गंभीर दुखापत झाली नाही.
पाटील हे गडहिंग्लजमधून चंदगडला जाताना महागाव येथे पाच रस्ता येथे कार्यकर्त्यांनी जेसीबीतून गुलाल उधळून आनंद साजरा करण्याचे नियोजन केले होते. दरम्यान नूतन आमदार पाटील हे आल्यावर महिलांनी ओवाळण्यासाठी आरतीही आणली होती. महिला आरती करताना वरून जेसीबीतून गुलाल टाकण्यात आला याचवेळी आगीशी संपर्कात आल्यावर आगीचा भडका उडाला. यामध्ये उपस्थित महिला व पाटील यांना किरकोळ भाजले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी फोन करून घटनेची माहिती घेतली. हा गुलाल उन्हात तापल्याने आगीशी संपर्क आल्यावर आगीचा भडका उडाल्याचे बोलले जाते.