

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारादरम्यान (Maharashtra Assembly Polls) महिला नेत्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध केला. त्यांनी अशा प्रकरणात अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर टीका करताना खालची पातळी गाठणे टाळले पाहिजेत, असे कुमार यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी शिंदे शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी (Shaina NC) यांचा 'इम्पोर्टेड माल' असा उल्लेख केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अरविंद सावंत यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कारवाईचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेच्या मुंबादेवी येथील उमेदवार शायना एनसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "महिलांबद्दल अपमानास्पद शब्द वापरू नयेत, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेचे मी स्वागत करते. मला पंतप्रधानांचेही आभार मानायचे आहेत. कारण त्यांनी आपल्या भाषणात असेही म्हटले आहे की, जे महिलांबद्दल चुकीचे शब्द वापरतात, त्यांची विकृत मानसिकता दिसून येते. मला एकनाथ शिंदे यांचेही आभार मानायचे आहेत. कारण त्यांनी खरोखरच एका लाडकी बहिणीला संधी दिली."
अरविंद सावंत यांनी 'माल' म्हणून संबोधल्याचा आरोप शायना एनसी यांनी केला होता. तसा व्हिडीओ त्यांनी दाखवून सावंत यांनी महिलांचा अपमान केला असून त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली होती. या प्रकरणी अरविंद सावंत यांच्यावर नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अरविंद सावंत यांनी, त्यांनी केलेल्या वक्तव्यप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली.
अरविंद सावंत यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, "असे वातावरण तयार केले की मी एका महिलेचा अपमान केला. आमच्याकडून महिलांचा अपमान कधीच होणार नाही. माझ्या एका वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. मला जाणूनबुजून वेगळा अर्थ काढून लक्ष्य केले जात आहे, याचे मला दु:ख वाटते. पण तरीही माझ्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.''