नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी भाजपने काँग्रेसला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 'कॅश फॉर व्होट' प्रकरणी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळाल्यापासून २४ तासांच्या आत या तिन्ही नेत्यांनी विनोद तावडे यांची बिनशर्त माफी मागावी, असे त्यात म्हटले आहे. तसेच तीन इंग्रजी वृत्तपत्रे आणि तीन प्रादेशिक भाषेतील वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर माफीनामा प्रसिद्ध करा. तसेच ‘एक्स’ वर माफीनामा पोस्ट करा. त्यांनी माफी न मागितल्यास तिन्ही नेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करतील आणि १०० कोटी रुपयांची दिवाणी खटलाही दाखल करतील.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी मुंबईत नाट्यमय प्रकार घडला होता. त्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी थेट प्रतिक्रिया देत तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचे आरोप केले होते. त्यानंतर तावडे म्हणाले की, काँग्रेसला फक्त माझी आणि माझ्या पक्षाची बदनामी करायची होती. मी एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे, मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. पण मी असे काहीही केले नाही. काँग्रेसच्या नेत्यांना माझी, पक्षाची आणि माझ्या नेत्यांची बदनामी करायची होती, त्यामुळे त्यांनी हे खोटे दावे माध्यमांसमोर आणि जनतेसमोर मांडले, म्हणून मी त्यांना न्यायालयाची नोटीस बजावून जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असे सांगितले आहे.
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला होता. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केला आहे. तावडे आणि विधानसभेचे उमेदवार राजन नाईक यांनी वाटण्यासाठी पाच कोटी रुपये आणले होते, असे बविआने म्हटले होते. या संपूर्ण प्रकरणी तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. एक एफआयआर तावडे यांच्याविरोधात, दुसरा भाजप उमेदवार राजन नाईक आणि इतरांविरोधात आणि तिसरा बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांविरोधात नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणानंतर विनोद तावडे यांचे वक्तव्यही समोर आले आहे. नालासोपाऱ्यातील आमदारांची बैठक असल्याचे तावडे म्हणाले होते. मी त्यांना मतदानाच्या दिवशी आदर्श आचारसंहिता, मतदान यंत्र कसे सील केले जाईल आणि काही आक्षेप नोंदवायचे असल्यास काय करावे याची माहिती देण्यासाठी आलो होतो. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी. सीसीटीव्ही फुटेजही तपासावे, असे तावडे यांनी म्हटले होते. त्यानंतर आता नोटीस पाठवली आहे.