वाळूज महानगर : अंतरवली सराटीतील पोलिसांसारखी तुमची हालत करू, अशी धमकी पोलिसांना देत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी आणि आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी राजू शिंदे यांच्यासह ४० ते ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी दंगा काबू पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, २० नोव्हेंबर रोजी बजाजनगर येथील एका शाळेतील मतदान केंद्राच्या बाहेर १०० मीटरच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात जमाव एकत्रित जमलेला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांना मिळाली होती.
यावरून पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले, क्यूआरटी पथकाचे पोलीस अंमलदारसलमान पठाण, आकाश घोडके, विलास इंगळे, कृष्णा सावंत, योगेश चौधरी तसेच पोलीस उपनिरीक्षक सखाराम पठाडे, सहाय्यक फौजदार शशिकांत सोनवणे, संजय वाघचौरे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर टाकसाळे, अशोक पुरी हे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एका शाळेजवळ आले. त्यावेळी त्यांना मतदान केंद्राच्या १०० मीटर क्षेत्राच्या आत ४०० ते ५०० लोकांचा जमाव जमलेला तसेच यातील काही जण मतदान करण्यासाठी जाणाऱ्या लोकांना थांबवून अडथळा निर्माण करताना दिसून आले.
यावेळी पोलीस आयुक्त बगाटे यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे जमलेल्या लोकांना तेथून जाण्यास सांगून सायरन वाजवून ते गाडीच्या खाली उतरले. यावेळी पोलिसांना पाहून जमलेले लोक तेथून पळ काढत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या दुचाकीवरील तसेच एकमेकांना धक्का लागून जमावातील काही पुरुष आणि महिला किरकोळ जखमी झाले.
यावेळी पोलिसांनी त्यांना निवडणूक प्रचार बंद असल्याचे सांगून १०० मीटर अंतरामध्ये प्रचार करू नका, रस्ता अडवू नका, तुम्ही येथून निघून जा, अशा सूचना केल्या. मात्र राजू शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष करून पोलिसांसोबत आरेरावी सुरु केली. यावेळी राजू शिंदे यांनी पोलीस उपायुक्त बगाटे तसेच पोलिसांना अंतरवली सराटीतील पोलिसांसारखी तुमची हालत करू, अशी धमकी देऊन राजू शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.