मोहोळ : बुधवारी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मतदान मतपेटीत बंद झाले असून प्रचाराची धावपळ आणि मतदारांची विनवणी करण्याचा मानसिक ताण संपला आहे. 15 दिवसांच्या प्रचाराच्या धावपळीनंतर सर्वच उमेदवार आपल्या कुटुंबासमवेत मोकळा श्वास घेत आहेत. आता उमेदवार आणि मतदारांना निकालाची उत्सुकता लागली आहे.
मोहोळचे दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार आणि गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचार सभा, कॉर्नर बैठका व सोशल मीडियावर रात्रंदिवस सक्रिय असलेले मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले अनगरच्या लोकनेते परिवारातील माजी आमदार राजन पाटील त्यांचे दोन्ही चिरंजीव लोकनेते शुगरचे अध्यक्ष बाळराजे (विक्रांत) पाटील व सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील तसेच प्रतिस्पर्धी गटाचे तुतारीचे राजू खरे आणि मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या छत्राखाली एकवटलेले विरोधी गटातील उमेश पाटील, दीपक गायकवाड, विजयराज डोंगरे, चरणराज चवरे, संजय क्षीरसागर, शाहीन शेख, सुलेमान तांबोळी, किशोर पवार, विक्रांत दळवी यांच्यासह प्रमुख आपापल्या कुटुंबासमवेत मोकळा श्वास घेत आहेत.
अखरेच्या टप्प्यातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या दुरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याकडे दोन्ही उमेदवारांसह मोहोळ मतदारसंघात निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेकांनी आमदार यशवंत माने विजयी होतील, की राजू खरे याबाबत मोहोळ मतदारसंघात पैजा लावल्या आहेत. मात्र अत्यंत चुरशीचे झालेले मतदान आणि मोहोळ तालुक्यातील काही कळीच्या मुद्द्यांवरून उमेदवारांची धाकधूक मात्र वाढली आहे हे मात्र नक्की. सोशल मीडियावर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी गुलाल आपलाच अशा पोस्ट सोशल मीडियाच्या व्हॉटस्अॅप, फेसबुक व इन्स्टाग्रामवर केल्या आहेत. मात्र येत्या 23 तारखेला निकालादिवशीच कोण बाजी मारणार हे ठरणार आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आमदार यशवंत हे सध्या इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील आपल्या कुटुंबासमवेत वेळ देत आहेत. त्यांचे कुटुंब आजही एकत्र असून लहान मोठी ज्येष्ठ असे सर्व मिळून 35 जणांचे कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत आहे.