नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह ४० नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांनाही स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत देशातील आठ राज्यांचे मुख्यमंत्री आणि डझनभर केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वाधिक मागणी आहे. पंतप्रधान मोदींचा झंझावाती दौरा दिवाळीनंतर सुरू होणार आहे. पंतप्रधान जवळपास प्रत्येक विभागात सभा घेणार आहेत. ८ दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सभा घेणार आहेत.