

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातील ६२ पैकी ४७ जागांवर भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत. या विभागातील बारा विधानसभा मतदारसंघ राखीव असल्याने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना स्थान देण्यात आले आहे. तसेच, उर्वरित ३५ पैकी तब्बल १९ मतदारसंघांमध्ये भाजपने कुणबी समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे. याची सरासरी टक्केवारी ५४.२८ आहे.
विदर्भात भाजपच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघांमध्ये उत्तर नागपूर, उमरेड, आमगाव, गडचिरोली, आरमोरी, चंद्रपूर, राळेगाव, आर्णी, उमरखेड, मेळघाट, मूर्तिजापूर, वाशीम हे राखीव मतदारसंघ आहेत. उर्वरित मतदारसंघांचा विचार करता, नागपूर जिल्ह्यात भाजपने पश्चिम नागपूरमधून सुधाकर कोहळे, दक्षिण नागपूरमधून मोहन मते, सावनेरात डॉ. आशिष देशमुख, हिंगण्यात समीर मेघे यांना उमेदवारी दिली आहे. यासोबतच भंडारा जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध कुणबी समाजातील अविनाश ब्राह्मणकर यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी मतदारसंघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना धक्का देण्यासाठी कृष्णलाल सहारे यांना संधी देण्यात आली आहे. सहारे यांनी अर्ज दाखल केला तेव्हा समाज बांधवांच्या प्रचंड उपस्थितीने वडेट्टीवारांना ब्रह्मपुरीत तळ ठोकण्यासाठी बाध्य केले.
पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये कुणबी समाजाची लोकसंख्या अधिक आहे. हीच बाब लक्षात घेऊन लोकसंख्येच्या प्रमाणात कुणबी व मराठा समाजाला भाजपने उमेदवारीत प्रतिनिधित्व दिले आहे. केवळ योजनांच्या माध्यमातूनच नव्हे, तर सत्तेतही त्यांना सहभागी करून घेण्यासाठी निम्म्याहून अधिक जागांवर कुणबी व मराठा उमेदवार दिले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याचे वचन आपल्या सभांमधून देत आहेत. प्रत्यक्षात विदर्भात उमेदवारी वाटप करताना त्यांच्या पक्षातील नेत्यांना; नव्हे खुद्द त्यांनाही या बाबीचा विसर पडल्याचे दिसून येते. विदर्भात बहुसंख्य असलेल्या कुणबी व मराठा समाजाला कॉंग्रेसकडून अपेक्षित संधी देण्यात आली नाही. हा कुठला न्याय आहे, अशा शब्दांत कुणबी समाजातील नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या