

महाड : महाड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भरतशेठ गोगावले यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत आज (दि.२९) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाड शहरात सर्वत्र हजारो शिवसैनिकांचे भगवे वादळ पाहावयास मिळाले.
यावेळी रायगडचे खासदार सुनील तटकरे, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, युवा नेते विकास गोगावले, भाजप नेते व आमदार प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते.
महाड विधानसभा मतदारसंघातील एकही गाव, वाडी वस्ती विकास कामांपासून वंचित राहिली असल्याचे दाखवून द्यावे, असे आव्हान आमदार भरतशेठ गोगावले यांनी विरोधकांना दिले.
याप्रसंगी माजी आमदार मुस्ताक अंतुले व भाजपचे महाड नेते डॉ. अजय जोगळेकर यांनी मनोगत व्यक्त करून आमदार गोगावले यांच्या चौथ्या विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.