सोलापूर : राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. त्याचबरोबर महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. तरीही जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत पुरुषांपेक्षा महिलांचे सरासरी तीन टक्क्यांनी मतदान कमीच झाले आहे. पुरुषांचे 69.31 टक्के तर महिलांचे 66.07 टक्के मतदान झाले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुरू आहे. दिवाळीपर्यंतचे दीड हजार रुपयांप्रमाणे तीन-चार हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. या योजनेचा आपल्याला फायदा होईल, असा अंदाज सत्ताधार्यांना वाटत आहे. मात्र, प्रत्यक्षात पुरुषांपेक्षा महिलांचे सरासरी मतदान कमीच झाले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय गाजली. मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी ही योजना सुरू केली होती. त्या योजनेचा अतिशय सकारात्मक परिणाम मध्य प्रदेश विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत झाला होता.
लोकसभेला तर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची स्थिती अतिशय दयनीय झाली होती. याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. सत्ताधार्यांनी या योजनेसाठी दिल्या जाणार्या रकमेमध्ये दीड हजार रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत वाढ करू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. महाविकास आघाडीनेही हाच कित्ता गिरवत महिलांना तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा झाल्यामुळे त्यांनी महायुती सरकारला मतदान केल्याचा दावा सत्ताधार्यांकडून केला जात आहे. मात्र, खरोखरच असे झाले आहे का यासाठी शनिवारपर्यंत (दि.23) वाट पाहावी लागणार आहे.
जिल्ह्यात 26 लाख सहा हजार 571 मतदारांनी मतदान केले आहे. त्यामध्ये 13 लाख 66 हजार 588 पुरुष तर 12 लाख 39 हजार 868 महिला मतदारांचा समावेश आहे. 115 तृतीयपंथीयांनी मतदान केले.