Maharashtra Elections 2024 | बार्शी मतदारसंघात काँटे की टक्कर

आ. राजेंद्र राऊत विरुद्ध माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यात २५ वर्षांपासूनचा पारंपरिक सामना
Rajendra Raut vs Dilip Sopal
बार्शी मतदारसंघात काँटे की टक्करfile photo
Published on
Updated on

संजय पाठक, सोलापूर

Maharashtra Elections 2024 | बार्शी हा सोलापूर जिल्ह्यातील, परंतु मराठवाड्याच्या संस्कृतीशी समरस झालेला विधानसभा मतदारसंघ. मराठवाड्यातील घटना-घडामोडींचे पडसाद या तालुक्याच्या राजकारणावर उमटतातच. या ठिकाणी विद्यमान आ. राजेंद्र राऊत विरुद्ध माजी मंत्री दिलीप सोपल असा गत 25 वर्षांपासूनचा पारंपरिक सामना रंगला आहे. दोन्ही बाजूंकडून शिवराळ भाषणांचा भडिमार, जातिभेद यामुळे या मतदारसंघातील वातावरण गढूळ झाले आहे. एकूणच या मतदारसंघात काँटे की टक्कर सुरू आहे.

बार्शी मतदारसंघात यंदा प्रथमच दोन शिवसेनेत सामना होत आहे. शिंदे गटाकडून विद्यमान आमदार राजेंद्र राऊत रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरुद्ध त्यांचे तब्बल 25 वर्षांपासूनचे प्रतिस्पर्धी, माजी मंत्री दिलीप सोपल हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. गत पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात केलेल्या विकासकामांचा अजेंडा समोर ठेवत आ. राऊत हे निवडणूक लढवत आहेत, तर दुसर्‍या बाजूला सोपल हे तालुक्यात भयमुक्त, दहशतमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी म्हणून आपण निवडणूक रिंगणात असल्याचे सांगत आहेत. सोपल यांच्या बाजूने लिंगायत समाज असल्याची चर्चा आहे. तरी गत पाच वर्षांत आ. राऊत यांनी बेरजेचे राजकारण करत लिंगायत समाजाच्या अनेक नेत्यांना, घराण्यांना स्वतःबरोबर जोडून घेण्यात यश मिळवले आहे.

सोपल अन् राऊत यांना पाठबळ कुणाचे?

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे सोपल हे एकेकाळचे आवडते व्यक्तिमत्त्व होते, आताही आहेतच. त्यातच त्यांना यंदा माजी मुख्यमंत्री ठाकरेंचीदेखील साथ मिळाली आहे. दुसर्‍या बाजूला आ. राऊत हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘किचन कॅबिनेट’मधील गणले जातात. त्यातच त्यांना सोयीस्कररीत्या मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना ‘जॉईन’ करण्याची सूचनाही याच ‘किचन कॅबिनेट’मधून झाल्याची चर्चा आहे.

  • लोकसभा निवडणुकीत धाराशिव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांना बार्शी भागातून तब्बल 55 हजारांचे मताधिक्य मिळाले. यामध्ये माजी मंत्री दिलीप सोपल यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे या निवडणुकीत ती मते सोपल यांच्याकडे वळणार का, हा औत्सुक्याचा मुद्दा ठरेल.

  • मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा या मतदारसंघात तब्बल 2.58 टक्के नवमतदारांची भर पडली आहे. हे मतदान नेमके कोणाच्या पारड्यात जाईल, त्यावर विजयाचा लोलक निश्चित होईल.

  • 2019 च्या निवडणुकीत आ. राऊत यांच्यासोबत असणारे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले हे यंदा मात्र माजी मंत्री सोपल यांच्या पाठीशी आहेत. त्यांचा ‘इफेक्ट’ कितपत होईल, यावरही या निवडणुकीचा निकाल ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news