सुहास जगताप, पुणे
लोकसभेनंतर विधानसभेला पुन्हा एकदा बारामतीत पवार एकमेकांच्या विरोधात लढले. प्रचारानंतर मतदानाच्या दिवशी भिडलेच आणि यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. दोन्ही पवारांमधील हा राडा बारामतीकरांसाठी अर्थातच अकल्पनीय असा ठरतो आहे.
मतदानाच्या दिवशी बारामतीत गांधी बालक मंदिर मतदान केंद्रावर दोन्ही पवारांच्या कार्यकत्यांमध्ये चांगलाच राडा झाला. पवार असे एकमेकांच्या विरोधात रस्त्यावर उतरून हातघाईवर येतील, असे बारामतीकरांना स्वप्नातही वाटले नसेल, ते प्रत्यक्षात घडले आहे. लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकीत बारामतीच्या पवारांनी एकमेकाळची उणीदुणी काढण्याचा नवा विक्रम केला आहे. अजित पवार यांच्या विरोधात यावेळी त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या पाठिंब्यावर मैदानात आहेत. अजित पवार यांना प्रथमच घरातून आव्हान मिळाल्याने ही लढत अतिशय चुरशीची झाली. प्रथमच बारामतीत अजित पवार यांना घाम गाळावा लागला आहे.
मतदानाच्या दिवशी गांधी बालक मंदिर मतदान केंद्रावर युगेंद्र यांच्या मातोश्री आणि अजित पवार यांच्या भावजय शर्मिला पवार यांच्या बरोबर अजित पवार यांची चांगलीच चकमक झडली. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला, तर हे असले काही आम्ही करत नाही, हे आरोप धादांत खोटे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी या मतदान केंद्रावर चांगलाच गोंधळ झाल्याचे दिसले. बारामतीच्या यापूर्वीच्या निवडणुका संपूर्णपणे एकतर्फी झालेल्या होत्या. त्यामुळे पवार कुटुंबातील व्यक्तींनी मतदान केंद्र ते मतदान केंद्र भेटी देणे, मतदानाच्या दिवशी रस्त्यावर फिरून मतदारांना अभिवादन करणे, असले प्रकार फारसे कधी दिसले नाहीत. यावेळी मात्र अजित पवार यांच्या आणि शरद पवारांच्या बाजूचे असे दोन्ही कुटुंबीय रस्त्यावर उतरून मतदान केंद्रास भेटी देत होते. त्यातूनच अनेक ठिकाणी तक्रारी, कार्यकर्त्यांचा घोळका असे प्रकार घडले.
बारामतीच्या राजकारणात दूरगामी परिणाम, याचीच ही नांदी बारामतीत दोन्ही पवार एकमेकांना खरोखरच रस्त्यावर भिडल्याचे यावरून दिसून आले. बारामतीच्या राजकारणात याचा दूरगामी परिणाम होणार आहे. कारण, युगेंद्र पवार हे बारामतीचे पुढील नेतृत्व आहे, असे शरद पवारांनी जाहीर करून टाकलेले आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच सहकारातील निवडणुकांमध्ये पुन्हा हे दोन्ही गट समोरासमोर येऊन असे प्रकार घडतच राहणार असल्याचे संकेत बुधवारी बारामतीत घडलेल्या घटनांवरून दिसून येत आहे.