

अमरावतीः जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटात विधानसभेच्या तिकिटावरून बंडखोरी झाली आहे. मातोश्रीवर सुनील खराटे यांना बडनेरातून उमेदवारी मिळताच माजी आमदार स्वर्गीय संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून बडनेरा विधानसभेत प्रीती बंड यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जात होते. मात्र ऐन वेळेवर जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांना उमेदवारी दिल्यामुळे बंड समर्थक नाराज झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर प्रीती बंड यांनी आपण काहीही झालं तरी बडनेरा विधानसभा निवडणूक लढविणारच,असा निर्धार केला आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. सोमवारी (दि.२८) प्रीती बंड आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
बडनेरा विधानसभा मतदारसंघ हा आमदार रवी राणा यांचा सातत्याने गड राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत देखील नवनीत राणा यांना या मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते. राणादांपत्य आणि शिवसेना यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राने हनुमान चालीसाच्या निमित्ताने अनुभवला आहे. दरम्यान आता ठाकरे गटाचे दोन उमेदवार या मतदारसंघात असल्यामुळे याचा फायदा नेमका कोणाला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून अद्याप या मतदारसंघात उमेदवार जाहीर झालेला नाही. ही जागा महायुतीत रवी राणा यांच्यासाठी सोडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते तुषार भारतीय देखील नाराज असून त्यांनीही निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे.