पाटण : राज्याचे लक्ष लागलेल्या पाटण विधानसभा मतदारसंघात सरासरी 74 टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र शांततेत व सुरळीत मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी सोपान टोम्पे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनंत गुरव यांनी दिली.
पाटण विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई, महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गटाचे भानुप्रताप उर्फ हर्षद कदम तर अपक्ष सत्यजित पाटणकर या तीन प्रमुख उमेदवारांसह बसपाचे महेश चव्हाण, वंचित आघाडीचे बाळासो जगताप, रिपाई ( ए ) विकास कांबळे, राष्ट्रीय समाज पक्ष विकास कदम, अपक्ष प्रताप मस्कर, संतोष यादव, विजय पाटणकर, सुरज पाटणकर असे एकूण 11 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदारसंघातील बहुतांश मतदान केंद्रांवर अतिशय चुरशीने मतदान सुरू झाले. ना.शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांचेसह देसाई कुटुंबियांनी मरळी येथे तर अपक्ष उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांनी सौ. यशस्विनीदेवी पाटणकर व माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व पाटणकर कुटुंबीयांनी पाटण तसेच हर्षद कदम यांनी मल्हारपेठ आणि अन्य उमेदवारांनी आपापल्या गावात मतदान केले. शंभूराज देसाई, सत्यजितसिंह पाटणकर, हर्षद कदम आदी उमेदवारांनी मतदारसंघातील अनेक विभागातील मतदान केंद्रांवर समक्ष भेटी दिल्या.
मतदार केंद्रांवर ज्येष्ठ व अपंगांसाठी व्हील चेअर ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक त्या सुविधा, महिलांसाठी विशेष बैठक व्यवस्था, सखी मतदान केंद्र, गरोदर मातांसाठी खास व्यवस्था, लहान बालकांसाठी पाळणाघराची व्यवस्था होती. उप विभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पाटणचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर व संबंधित पोलीस यंत्रणांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.