कणकवली मतदारसंघात सरासरी 70 टक्के मतदान

Maharashtra assembly poll | मतदान शांततेत; आता 23 तारीखच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष
Kankavli Constituency Voting
कणकवली ः विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. कणकवलीतील मतदान केंद्रावर मतदारांची लागलेली रांग. (छाया ः अनिकेत उचले)
Published on: 
Updated on: 

कणकवली ः कणकवली विधानसभा मतदारसंघातील 332 मतदान केंद्रांवर बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत शांततेत आणि चुरशीने सुमारे 70 टक्के मतदान झाले. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 2019 च्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का वाढला आहे. या मतदारसंघात सायंकाळी 5 वा. पर्यंत 67.46 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे एकूण मतदानाचा टक्का हा सुमारे 72 टक्केपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याने निवडणूक प्रशासनासह पोलिस यंत्रणेने समाधान व्यक्त केले.

बुधवारी सकाळी 7 वा. पासून मतदानास प्रारंभ झाला. त्यामुळे सकाळपासूनच मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याकरिता राजकीय पक्षांचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या कार्यकर्त्यांनी बुथ लावले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा अलर्ट होती. कणकवली मतदारसंघात एकूण 2 लाख 31 हजार 740 मतदार आहेत. या मतदारसंघात सकाळी 9 वा. पर्यंत सरासरी 9.46 टक्के, दु. 11 वा. पर्यंत सरासरी 21.53 टक्के, दु. 1 वा. पर्यंत सरासरी 45.11 टक्के, दु. 3 वा. पर्यंत सरासरी 57.20 टक्के तर सायंकाळी 5 वा. पर्यंत सरासरी 67.46 टक्के मतदान झाले होते. कणकवली मतदारसंघामध्ये 2019 मध्ये सरासरी 68 टक्के मतदान झाले होते. मात्र यावेळी 4 ते 5 टक्के मतदान वाढण्याचा अंदाज आहे. सकाळपासून उत्स्फूर्तपणे मतदार मतदानासाठी बाहेर पडत होते. वृध्द, अपंग व्यक्तींनाही कार्यकर्ते वाहनांनी मतदान केंद्रांवर घेऊन येत होते. काही चाकरमानी मंडळीही मतदानासाठी गावागावांत दाखल झाली होती. त्यामुळे दिवसभर निवडणुकीचाच माहोल पाहायला मिळत होता.(Maharashtra assembly poll)

सायंकाळी 6 वा. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सीलबंद केलेली मतदान यंत्रे घेऊन त्या त्या मतदान केंद्रांवरील निवडणूक अधिकारी, कर्मचारी एचपीसीएल च्या हॉलकडे दाखल होत होते. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकारी जगदिश कातकर व त्यांचे सहकारी तीन तालुक्यांचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.

विद्यामंदिरच्या पटांगणावर उभारलेल्या मंडपात इव्हीएम आणि इव्हीपॅट मशीन संबंधित नियुक्त अधिकार्‍यांकडे जमा करण्यात आल्या. तेथून त्या मतमोजणी होणार्‍या स्ट्राँग रूममध्ये पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी जगदिश कातकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

कणकवली विधानसभा मतदारसंघ हा तसा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो, मात्र लोकसभेप्रमाणेच याही निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी संयम बाळगून प्रचार यंत्रणा राबवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बुधवारी निवडणूक प्रक्रिया ही शांततेत पार पडली.

जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली डिवायएसपी घनःश्याम आढाव यांच्यासह तिन्ही तालुक्यांचे पोलिस निरीक्षक बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते.

राजकीय नेतेमंडळींनी केले कुटुंबासह मतदान

कणकवली विधानसभा मतदारसंघातील राजकीय नेते मंडळींनी सहकुटुंब मतदान केले. भाजप नेते खा. नारायण राणे यांनी वरवडे येथील मतदान केंद्रावर पत्नी सौ. नीलम राणे व कुटुंबीयांसमवेत सकाळच्या सत्रात मतदानाचा हक्क बजावला. तर महायुतीचे उमेदवार नितेश राणे व त्यांचे बंधू नीलेश राणे यांनी सायंकाळच्या सत्रात मतदान केले. त्याठिकाणी दोन्ही बंधूंनी एकमेकांची गळाभेट घेतली.(Maharashtra assembly poll)

दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी पत्नी व मुलांसमवेत कणकवली शाळा क्र. 1 येथे मतदानाचा हक्क बजावला. तर कुडाळचे मविआचे उमेदवार वैभव नाईक यांनीही पत्नीसमवेत कणकवली शाळा क्र. 5 येथे मतदान केले. तसेच राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनीही कणकवलीतील मतदान केंद्रावर कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.

विधानसभा मतदारसंघातील बहुतांशी मतदान केंद्रानजीक भाजप आणि ठाकरे शिवसेनेचे बुथ लागले होते. कणकवली विधानसभा मतदारसंघात खरी लढत ही भाजप विरुद्ध ठाकरे शिवसेना यांच्यातच आहे. त्यामुळे बुधवारी होणार्‍या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news