Nashik | 1.15 लाख युवा प्रथमच करणार मतदान
नाशिक : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात 18 व 19 वयोगटांतील एक लाख 15 हजार 441 युवक पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाच्या लेखी जिल्ह्यात वयाची 120 वर्षे पार केलेले 18 मतदार आहेत.
जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघांत 50 लाख 30 हजार 107 मतदार आहेत. एप्रिल-मे मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांनंतर निवडणूक शाखेने जिल्हाभरात विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविली. या मोहिमेला मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला असून, लोकसभेच्या तुलनेत जिल्ह्यात 4 लाख 83 हजार 417 मतदार वाढले आहेत. या नव मतदारांमध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण केलेले 1 लाख 15 हजार 441 युवा मतदार आहेत. त्यामध्ये 68 हजार 824 युवक आहेत. तर 46 हजार 612 युवती असून, अन्य मतदार 5 आहेत. हे सर्व युवक पहिल्यांदाच मतदान करणार असल्याने त्यांच्यामध्ये उत्साह अधिक आहे.
वयाची 120 वर्षे पूर्ण केलेले 18 मतदार
जिल्हा निवडणूक शाखेने अंतिम केलेल्या मतदारयादीत वयाची 120 वर्षे पूर्ण केलेले 11 पुरुष व 7 महिला अशा 18 मतदारांचा समावेश आहे. त्यामध्ये कळवण मतदारसंघात सर्वाधिक 13 मतदार असून, देवळालीत दोन जण आहेत. तसेच दिंडोरी, मालेगाव मध्य व चांदवडला प्रत्येकी एक मतदार आहे. दरम्यान, 110 ते 119 वर्षे वयोगटात चार पुरुष व तीन महिला असे एकूण 7 मतदार आहेत. या व्यतिरिक्त 100 ते 109 वयोगटामध्ये 2 हजार 165 मतदार आहेत.
18-19 वयोगटांतील मतदार
नांदगाव 6,989
मालेगाव मध्य 10402
मालेगाव बाह्य 7624
येवला 9108
बागलाण 5875
सिन्नर 7091
कळवण 10064
चांदवड 8845
नाशिक पूर्व 8072
निफाड 7299
दिंडोरी 6741
नाशिक मध्य 7332
नाशिक पश्चिम 9171
देवळाली 5105
इगतपुरी 5723

