वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील भाजपचे विद्यमान आमदार दादाराव केचे यांनी राजकीय संन्यास घेत असल्याचे सांगितले. आर्वी येथे त्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीनंतर चुकीचे आरोप होऊ लागले, असे सांगत त्यांनी ही घोषणा केली. ऐन निवडणुकीचा निकाल लागण्याच्या अगोदर आमदार केचे यांनी राजकीय संन्यास घेत असल्याचे जाहीर केल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत आर्वी विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या लक्षवेधक ठरला. भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी राजकीय संन्यास घेत पत्रकार परिषदेत जाहीर केले. निवडणुकीत पक्षाचे काम केले. उमेदवार निवडून यावा याकरिता परिश्रम घेतले. मात्र त्यानंतरही संशय घेण्यास सुरुवात झाली. असे त्यांनी स्पष्ट केले. दादाराव केचे हे दोनवेळा आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राहिले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना आमदार दादाराव केचे म्हणाले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आर्वी विधानसभेत उमेदवारी देण्याचे पक्षश्रेष्ठींनी आश्वासन दिले होते. मात्र त्यांना उमेदवारी न देता सुमीत वानखेडे यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिली. केचे यांनी अपक्ष व भाजपाचा उमेदवारी अर्ज भरला होता. नंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर अर्ज परत घेतला.
विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सुमीत वानखेडे यांच्यासाठी २७ प्रचार सभा, मेळावे, मोठ्या सभा यामध्ये स्वतः उपस्थित राहून भाषण दिले. काही मेळावे आयोजित करून घेतले. भाजपाचा उमेदवार निवडून येण्याकरता पक्षनिष्ठेने काम केले. पण काम केलं नसल्याचे निवडणुकीनंतर चुकीचे आरोप होऊ लागले. चार तारखेला अर्ज परत घेतला, ही चूक झाली का, असे वाटू लागले आहे. निवडणुकीच्या दिवशी सुद्धा प्रत्येक बूथ वर जाऊन निरीक्षण केले, असेही त्यांनी सांगितले. आता राजकारणापासून संन्यास घेतल्याचा निर्णय घेतल्याचे आमदार केचे यांनी जाहीर केले. यापुढे राजकारणात भाग घेणार नाही. परंतु माझ्या कार्यकर्त्यांवर प्रेम ठेवून कामे करेन, सामाजिक कार्य सुद्धा करेल, असे केचे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.