नागपूर : अनुजा सुनील केदार यांनी सावनेर कळमेश्वर विधानसभा निवडणुकीसाठी आज (गुरुवारी) सावनेर तहसील कार्यालय येथे आपला नामांकन अर्ज दाखल केला. अनुजा केदार या माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी आहेत. गेले अनेक दिवस सावनेरमधून कोण लढणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर सुनील केदार यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यांच्या निवडणूक लढण्यावर प्रतिबंध आले. अर्थातच सुनील केदार यांच्या पत्नी या मतदारसंघातून यावेळी लढणार असल्याचे बोलले जात होते.
ग्रामीण मधील सहाही जागा काँग्रेस- महाविकास आघाडी जिंकेल असा दावा कळमेश्वर येथील माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या सभेत माजी मंत्री सुनील केदार यांनी केला होता. मात्र, रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेस ऐवजी शिवसेना उबाठा गटाला संधी दिली गेली.
माजी राज्यमंत्री व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, चंद्रपाल चौकसे या मतदारसंघातून इच्छुक व पूर्वतयारीत असताना ही जागा शिवसेनेला दिल्यामुळे आता ते नेमकी कुठली भूमिका घेणार याकडे काँग्रेस वर्तुळाचे, समर्थकांचे लक्ष लागले आहे.केदार स्वतः या जागेसाठी मध्यस्थी करणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी, काँग्रेसची यादी येण्यापूर्वीच सावनेर येथील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे उलट सुलट चर्चा जोरात आहेत.(maharashtra assembly poll)
यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, गोविंदा ठाकरे पंचायत समिती सभापती, बाबा पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कळमेश्वर , रवींद्र चिखले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर, अनिल राय उपाध्यक्ष नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी आदी मान्यवर उपस्थित होते.