

पालघर : डहाणू विधानसभा मतदार संघात बहुजन विकास आघाडीने (बविआ) महाविकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विनोद निकोले यांना पाठिंबा दिला आहे. डहाणूतील बविआचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करत भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा दिला होता.
हा एक प्रकारे बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांना धक्का मानला जात होता. डहाणूतील राजकीय घडमोडी घडत असतानाच विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांना एका हॉटेलमध्ये बविआच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बविआने केला. मंगळवारी दिवसभर या नाट्यमय घडमोडीची चर्चा राज्यभरात रंगली होती.
तर रात्री उशिरा बविआचे तालुका प्रमुखांनी आणि इतर कार्यकर्त्यांनी निकोले यांना पाठिंबा जाहीर केला. उमेदवार पळवापळवीचे राजकारण म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे, अशी टीका यावेळी बविआ कार्यकर्त्यांनी केली. आता डहाणूतील लढत थेट भाजप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी अशी होत आहे.