

नागपूरः शरद पवार जे म्हणाले ते खरंच आहे. राज्यात अनेक ठिकाणी रोकड पकडली गेली आहे. हेलिकॉप्टरमधून पैसे पोहोचवण्याचे काम झाले आहे. बॅगा उचलायला दोन दोन माणसं लागतात का? नियमांचा, आचारसंहितेचा भंग करून पैशाच्या बळावर सत्ता काबीज करायला हे निघाले आहेत, त्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे. जिथे एबी फॉर्म हेलिकॉप्टरने पाठवलं जातात तिथे पैसा पाठवण्यासाठी पोलिसांच्या वाहनाचा वापर होणार नाही हे कशावरून ? असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरोबर बोलले, ते 23 तारखेपर्यंतच महायुतीचे टीम लीडर आहेत. निकाल लागल्यानंतर मात्र ते टीमचे लीडर असणार आहेत काय असा चिमटा वडेट्टीवार यांनी काढला. फडणवीस यांची सुरक्षा व्यवस्था वाढल्याबाबत विचारले असता म्हणाले, अहवाल देणारे तेच आहेत, सुरक्षा देणारे ही तेच आहेत. राजकीय नेत्यांना धोका असेल तर सुरक्षा दिलीच पाहिजे. अजित पवारांची स्थिती अशी झाली आहे, धरलं तर चावते, सोडलं तर पळते, थोडक्यात आता ते कुठेही गेले तरी खड्ड्यात पडणार अशी अवस्था त्यांची करून ठेवली आहे. त्यामुळे जयंत पाटील जे बोलले, ते चांगल्या शब्दात बोलले आहेत. ही ब्लॅकमेलिंग नाही, तर हवा त्या पद्धतीने अजित पवारांचा वापर करून घेतला जात आहे. बहुजनांना वापरायचं आणि फेकायचं ही भाजपची पॉलिसीच आहे. लोकसभेत यांनी एक एक मतदारसंघात 50-50 कोटी रुपये खर्च केले. तरी पडले मग हे काय गाफील राहणं आहे का, मुळात सरकार विरोधात असंतोष होता, तो लोकसभेत दिसून आला आणि त्यापेक्षा दुप्पट असंतोष विधानसभेमध्येही दिसून येईल.
भाजपची युती महबूबा मुफ्ती सोबत झाली होती ती कोणत्या कारणासाठी झाली होती याविषयीचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे. आमच्या बहिणींची फसवणूक करण्याचा नवीन धंदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुरू केला आहे. दीड हजार रुपये दिले आणि विजेचे बिल 40% ने वाढवले.तेल, तुरीची डाळ ही महाग केली आहे.
सोमवारपर्यंत बंडखोरी मागे होईल. अनेक बंडखोरांसोबत चर्चा झाली आहे. सकारात्मक प्रतिसाद आहे. 90% पेक्षा जास्त बंडखोर त्यांची उमेदवारी मागे घेतील असा दावा वडेट्टीवार यांनी केला.