

देवगड : आमचे हिंदुत्व हे घरातील चूल पेटविणारे तर भाजपाचे हिंदुत्व हे घर पेटविणारे, असा घणाघात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केला. भाजपाला सर्व अदानीच्या घशात घालायचे आहे. भाजपाचे खरे मुख्यमंत्री हे अदानीच असून हे बदलण्यासाठी परिवर्तन आवश्यक आहे. भाजपाने महाराष्ट्र अंधारात नेला त्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी, परिवर्तनासाठी मशाल पेटवावीच लागेल, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी देवगड येथे प्रचारसभेत केले.
कणकवली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ देवगड सारस्वत बँकेसमोरील पटांगणात आयोजित प्रचारसभेत ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर, शिवसेना नेते गौरीशंकर खोत, सतिश सावंत, परशुराम उपरकर, अतुल रावराणे, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, स्वप्नील धुरी, शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, जयेश नर, अॅड.प्रसाद करंदीकर, युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, फरीद काझी, महिला संघटक हर्षा ठाकूर, सायली घाडीगावकर आदी शिवसेना, महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, भाजपाने मुंबईमधील 1080 एकर जमीन अदानीला दिली. मुंबई अदानीला विकण्याचा भाजपाचा डाव असून आता त्यांचे लक्ष कोकणावर आहे.कारण भाजपाचे खरे मुख्यमंत्री हे अदानीच आहेत.महाराष्ट्राला अदानीच्या तावडीतून वाचवायचे असेल तर परिवर्तन आवश्यक आहे.
शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर हे धडपडणारे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत.आता आमिषे दाखिवले जातील मात्र लढायचे आहे त्यामुळे कुणालाही घाबरू नका.अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही.राज्यकत्यार्ंनी सर्वसामान्यांचा जो छळ सुरू केला आहे अशा राज्यकर्त्यांना दूर करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भाजपाने 2014 पासून फसव्या योजना आणल्या. पहिली योजना 15 लाख देण्याची होती. त्यांनतर लाडकी बहीण योजना ही महिलांना महिना 1500 रूपये देणारी योजना आणली. पुन्हा भाजपा सत्तेत आल्यास 1500 मधील दोन शून्य काढून केवळ 15 रूपये देण्याची योजना आणतील, यामुळे फसव्या भाजपापासून सावध राहा. ‘एक है तो सेफ है’ असा नारा पंतप्रधान मोदी देतात मात्र ‘एक है तो सेफ है, भाजपसे दोन हात दुर रहे तो सब सेफ है’ असे सांगत परिवर्तनाची मशाल पेटवून राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आणा,असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे यांच्यावरही टीका केली.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर देवगडचा प्रसिध्द असलेल्या हापूस आंब्यासाठी जागतिक पातळीवर मार्केट उपलब्ध करून देण्याचा तसेच शेतकर्यांना फसव्या विमा कंपन्यांबाबतही पुनर्विचार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.