अकलूज : आपण 1600 कोटी रुपयांची कामे करणार असल्याची घोषणा केली व ती पूर्णही केली. 2014 पूर्वी सोलापूर जिल्ह्यात 347 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग होता. तो आता 987 किलोमीटरचा झाला आहे. माळशिरस तालुक्यातून संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग 987 किलोमीटरचा, तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग 130 किलोमीटर असून तो पूर्णत्वास येत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
अकलूज येथील विजय चौकात माळशिरस विधानसभा भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. नितीन गडकरी पुढे म्हणाले की, काँग्रेसने भाजपबद्दल अपप्रचार केला. परंतु काँग्रेसने मुस्लिमांना व दलितांना काय दिले. पानाची, चहाची टपरी, ड्रायव्हर, क्लिनर दिले, परंतु एकही धंदा दिला नाही. आपण मात्र त्यांना अभियांत्रिकी महाविद्यालय दिले. शेतकर्यांनी आता केवळ शेती व्यवसाय न करता शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे. शेतकर्यांनी अन्नदाताबरोबर ऊर्जादाता, इंधनदाता बनावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून केलेल्या कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी राजकुमार पाटील, बाळासाहेब सरगर, संजीवनी पाटील, के.के. पाटील, बी.वाय. राऊत, हनुमंत सुळ, आप्पासाहेब पाटील, सोमनाथ भोसले, रमेश पाटील, बाजीराव काटकर, ऋतुजा मोरे, संस्कृती सातपुते, शरद मोरे संजय देशमुख उपस्थित होते.