कुडाळ : कुडाळ विधानसभा मतदारसंघातील सर्व 279 केंद्रांवर बुधवारी शांततेत मतदान पार पडले. मतदारसंघात सरासरी 72.29 टक्के मतदान झाले. यात पुरुष 81हजार 536 तर स्त्री 75 हजार 450 असे मिळून सरासरी 1 लाख 57 हजार 13 मतदारांनी मतदान केले. या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार वैभव विजय नाईक, महायुतीकडून शिवसेनेचे नीलेश नारायण राणे, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून अनंतराज नंदकिशोर पाटकर, बहुजन समाज पार्टीकडून रवींद्र हरिश्चंद्र कसालकर, अपक्ष उमेदवार उज्वला विजय येळावीकर या पाच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. शनिवार 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर कुडाळ विधानसभेचा किंग कोण हे स्पष्ट होणार आहे.
पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी कुडाळ मतदारसंघात बुधवारी सर्व केंद्रांवर शांततेत व उत्साहात मतदान सुरू झाले, काही केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीन रिप्लेसमेंट वगळता सर्व केंद्रांवर सायंकाळी 6 वा.पर्यंत शांततेत मतदान पार पडले. एकूणच मतदानाचा टक्का वाढल्याने प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.(Maharashtra assembly poll)
जिल्हाधिकारी अनिल पाटील व जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी स्वतः कुडाळ विधानसभा मतदारसंघातील केंद्रांना भेटी दिल्या व केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी श्री.पाटील यांनी रानबांबुळी, कुडाळ शहरातील कुडाळ हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्राला भेट देवून मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तहसीलदार वीरसिंग वसावे, पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, न. पं. मुख्याधिकारी अरविंद नातू उपस्थित होते. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी कुडाळ हायस्कूल मतदान केंद्राला भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला. पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम उपस्थित होते.
बिबवणे जि.प.प्राथमिक शाळा नं.1 येथे सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. या केंद्रावर सजावट करण्यात आली होती. या केंद्रावर सर्व महिला अधिकारी व कर्मचार्यांनी निवडणूक कामकाज यशस्वीपणे सांभाळले. तेथे महिला मतदारांचा चांगला प्रतिसाद दिसून आला.(Maharashtra assembly poll)
कुडाळ तालुक्यात सर्वच मतदान केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. दरम्यान शहरात पोलिस बळ अपुरे असल्याने 17 एनसीसी कॅडेट व 6 एनएसएस कॅडेट पोलिसांच्या दिमतीला तैनात ठेवण्यात आले होते.
मतदारसंघात मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतराच्या बाहेर महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदेगट - भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपले बुथ लावले होते. सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदानाच्या वेळेत मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत ये-जा करण्यासाठी त्या-त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वाहनांची तसेच चहा, नाश्ताची सोय केली होती. दरम्यान मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरातील सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आल्याने त्या-त्या परिसरात दुकाने, आस्थापने बंद होती.
मतदानाच्या या उत्साहात ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, दिव्यांग व्यक्ती, नवमतदार उत्स्फूर्त सहभाग नोंदविताना दिसून आले. सर्व मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्यात पिण्याचे पाणी, मंडप किंवा शेड, मतदार सहाय्य्यता केंद्र, प्रथमोपचार पेट्या तसेच आरोग्याशी संबंधित अडचणीसाठी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्र, व्हीलचेअर यासह सर्व प्रकारच्या पूरक सोयी सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करुन दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांनी समाधान व्यक्त केले.(Maharashtra assembly poll)
कुडाळ शहरातील बुथवर माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, सौ.नीलम राणे तसेच महायुतीचे उमेदवार नीलेश राणे यांनी मतदारसंघातील बुथवर भेटी देऊन कार्यकर्त्यांकडून मतदानाचा आढावा घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांनीही मतदारसंघातील बुथवर भेटी देऊन कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला.
कुडाळ तालुक्यातील वालावल व मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील केंद्रावर एकाच नावाच्या दोन व्यक्ती पैकी एका व्यक्तीने आधी मतदान केले.त्यानंतर दुसरी व्यक्ती मतदानासाठी उपस्थित राहीली. तुम्ही ज्या नावाच्या व्यक्तीचे मतदान करून घेतला ती व्यक्ती ती नसुन मीच आहे, असे सांगितले व आपले ओळखपत्र दाखविले. अखेर दोन्ही ठिकाणी त्या व्यक्तींना मतदान करण्याची प्रशासनाने परवानगी दिली.मात्र वालावल येथील मतदानाबाबत एका राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी याबाबत आक्षेप घेत नवडणूक निर्णय अधिकार्याचे लक्ष वेधले.दरम्यान कुडाळ शहरातील न्यू इंग्लिश स्कूल केंद्रावर असाच प्रकार घडल्याची चर्चा आहे.
मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावरील सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आल्याने त्या-त्या परिसरात दुकाने, आस्थापने बंद ठेवण्यात आली होती. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे व्यापारी व नागरिकांनी नाराजी व्यक्त करत यापूर्वी एवढ्या निवडणुका झाल्या त्यावेळी प्रशासनाने सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे निर्देश दिले नव्हते, मग आताच असे का केले? असा संतप्त सवाल काही व्यापार्यांनी केला.(Maharashtra assembly poll)